प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेरॉयचे आवाहन

समाजसेवा करायची आहे, परंतु वेळ नाही, अशी कारणे आपण देतो. मात्र, वेळ काढला तरच तो उपलब्ध होतो. आयुष्यात ९९ टक्के स्वत:साठी आणि एक टक्का समाजासाठी काम करा. त्याकरिता प्राधान्यक्रम नक्की करा. कारण कोणत्याही कामाची सुरुवात स्वत:पासून केल्यावरच मार्ग सापडतो. देवदूत आभाळातून येत नसतात. आपण सर्व जण देवदूत बनू शकतो. फक्त विचार आणि प्रत्यक्ष कृती यांमधले अंतर पार करायचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय याने रविवारी केले. विद्यार्थी सेवा संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात विवेक बोलत होता. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड, नगरसेविका राजश्री काळे, कणव चव्हाण या वेळी उपस्थित होते. ओंकार गोयल, पायल वाल्मिकी, देवेच चौहान अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा विवेकच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. विवेक म्हणाला,‘ देशात अनेक गरीब, गरजू नागरिक आहेत. त्यामुळे आपापल्या कुवतीनुसार दररोज त्यांच्यासाठी एक काम चांगले केल्यास लोकसंख्येनुसार प्रत्येक दिवशी १२५ कोटी कामे गरजू लोकांची होतील. आयुष्यात अडचणींबद्दल विचार केला तेव्हा त्या सुटल्या नाहीत. परंतु, उत्तराबद्दल विचार केला तेव्हा सर्व अडचणी सुटत गेल्या. हाच विचार करुन मी पंधरा वर्षांंपासून समाजसेवेत कार्यरत आहे.

समाजसेवा करणे खूप अवघड गोष्ट असून ही गोष्ट मला सामाजिक कार्याची सुरुवात केल्यानंतर समजले. आपल्या संस्कृतीमध्ये दान, धर्म, पुण्य हे शिकवले आहे.  मंदिरात जातो तेव्हाही परीक्षेत पास कर, व्यवसाय, नोकरीमध्ये वृद्धी आण, अशा मागण्यांद्वारे आपण देवाबरोबरही व्यापार करतो.

समाजासाठी संपूर्ण जीवन व्यथित करणे, हा मोठा संघर्ष आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सात कोटी नागरिक दिव्यांग असून काही वेळा त्यांची हेटाळणी होते, तर अनेक जण त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहतात, त्यामुळे दिव्यांग लोकांच्या केवळ शारीरिक समस्या नसून सामाजिक समस्याही खूप आहेत.’

चित्रपटांचे संवाद आज नाही 

भाषणाच्या उत्तरार्धात उपस्थितांकडून विवेकला चित्रपटातील संवाद ऐकविण्याची विनंती करण्यात आली. परंतु, हे व्यासपीठ आणि हा कार्यक्रम गंभीर असल्याने आज चित्रपटातील संवाद बोलून दाखवणार नाही, असे नम्रपणे सांगत त्याने मनोगताचा समारोप केला.