पुणे : ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या समाजमाध्यमांवर भरपूर चर्चेत आहे. सूरजने नुकतेच नवीन घरात गृहप्रवेश केला असून, तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोढवे या छोट्याश्या गावात राहतो. ‘टिकटॉक’वरील रील्सने त्याला रातोरात स्टार बनवले होते. मात्र, केंद्र सरकारने टिकटॉकवर बंदी आणली. त्यानंतर त्याने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगली प्रसिद्धी मिळवली. त्याच्या जोरावर सूरजला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात जाण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले आणि तो बिग बॉस मराठी ५चा विजेताही झाला.

बारामती तालुक्यातील मूर्टी-मोढवे येथे अतिशय सामान्य आणि साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या सूरज चव्हाणची धडपड आणि यशाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. लहान वयातच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतर काही दिवसातच आईचेही निधन झाले. या दुर्दैवी घटनांनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्या सूरजवर आली. या कठीण काळात त्याच्या आत्या आणि बहिणींनी त्याला मोठा आधार दिला. मात्र, कोरोनाच्या काळात हाताला कोणतेही काम नव्हते, अशा वेळी सूरजच्या भाच्याने त्याला मोबाईलवर रील बनविणे शिकवले. त्यातून त्याचा नवीन प्रवास सुरू झाला. काही महिन्यांत सूरजने लाखो प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्याची साधी भाषा, विनोदी सादरीकरण आकर्षणाचा विषय ठरले.

बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वात सूरजने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तो ‘गुलिगत स्टार’ म्हणून लोकप्रिय झाला. मध्यंतरी त्याला एका सिनेमातही संधी मिळाली. सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सूरजने त्याच्या नवीन घरात केलेल्या गृहप्रवेशाची चर्चा समाज माध्यमांवर रंगली होती. सूरजने प्रचंड मेहनतीने आलिशान बंगला उभारला आहे. या बंगल्याचे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. गृहप्रवेशाचा व्हिडीओ त्याने समाज माध्यमांवर शेअर केल्यानंतर, चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दरम्यान, सुरजने केलेल्या फोटोशूटकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. आता ही चर्चा खरी ठरली असून, बिग बॉस मराठी २०२४चा विजेता आणि संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेला रीलस्टार सूरज चव्हाण आता नव्या जीवनप्रवासाला सुरुवात करणार आहे. पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील संजना गोफणे हिच्याशी सूरजचे लग्न ठरले आहे. येत्या शनिवारी,२९ नोव्हेंबरला हे लग्न होणार आहे. त्यामुळे चव्हाण हा आता पुरंदरचा जावई होणार असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

संजना गोफणे ही सूरजच्या चुलतमामांची मुलगी असून दोघांचंही लव्हमॅरेज आहे. सूरज-संजनाचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला सासवड-जेजुरी रोड येथे पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर हा ‘गुलीगत किंग’ लग्नबंधनात अडकणार आहे.