पुणे : माॅडेल काॅलनी परिसरातील वादग्रस्त सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा (जैन बोर्डिंग) विक्री प्रकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी हा आदेश सोमवारी दिला.

जैन बोर्डिंगच्या भूमी विक्रीसंदर्भात दाखल याचिकेवर धर्मदाय आयुक्त अमोघ कालोटी यांच्या अध्यक्षतेखाली अतितातडीची सुनावणी झाली. संस्थेच्या मूळ धर्मदाय उद्देशाचे रक्षण करण्यासाठी स्टेटस को आदेश मागविण्यात आला होता.याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी युक्तिवाद सादर केला. एच.एन.डी. जैन बोर्डिंग ही संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि निवासासाठी स्थापन झाली आहे. संस्थेच्या मालमत्तेचा पुनर्विकास वा विक्री हा मूळ हेतूविरुद्ध असून धर्मदाय कायद्याच्या विरोधात आहे. व्यवहार करताना धर्मदाय कार्यालयाकडे परवानगी मागत असताना माहिती लपवण्यात आली. त्यामुळे सध्याची स्थिती कायम ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याची बाब पांडे यांनी निदर्शनास आणून दिली.

संस्थेच्या मालमत्तेबाबत कोणतेही व्यवहार, विक्री, बांधकाम अथवा हस्तांतरण पुढील आदेश येईपर्यंत करण्यात येऊ नयेत. मालमत्तेची विद्यमान स्थिती कायम ठेवावी. संस्थेच्या धर्मदाय स्वरूपाचा विचार करून मालमत्तेचे जतन करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. तसेच या ठिकाणी असलेल्या मंदिरासंदर्भात सविस्तर चौकशी करण्यात यावी. त्यामध्ये त्या ठिकाणी खरोखर मंदिर आहे का? मंदिर कोणत्या देवतेचे आहे? मंदिराची देखरेख आणि पूजा व्यवस्थापन कोण करत आहे? मंदिराची जागा किती क्षेत्रफळात आहे? प्रस्तावित पुनर्विकास झाल्यास त्या मंदिराला हानी होईल का? या मुद्द्यांवर स्पष्ट अहवाल सादर करण्याची सूचना धर्मादाय आयुक्तांनी केली.

धर्मदाय आयुक्तांनी या सर्व मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याचे आणि त्याचा सविस्तर अहवाल कार्यालयात सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान हा आदेश म्हणजे लढ्याचा पहिला कायदेशीर विजय आहे. धर्म आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही सुरू केलेली ही चळवळ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे असे याचिकाकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले. धर्मदाय आयुक्तांनी मंदिर आणि धर्मदाय उद्देशावर चौकशीचे निर्देश दिल्यामुळे आता संपूर्ण सत्य समाजासमोर येईल. हे फक्त संपत्तीचे नाही, तर शैक्षणिक, श्रद्धा आणि मूल्यांचे रक्षण आहे अशी प्रतिक्रिया अक्षय जैन यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

मॉडेल कॉलनी भागातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या सेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदा गोखले कन्स्टक्शनला विकल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला होता. या जागा विक्री प्रकरणात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोपही होत आहे. त्याविरोध जैन समाजाने शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. जैन समाजाच्या या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही पाठिंबा दर्शविला होता. या जागा विक्री करणाचे तीव्र पडसाद शहरात उमटत असून मोहोळ यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.