scorecardresearch

मोठी बातमी! लोणावळ्यात जमावबंदी ; १४४ कलम लागू

धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे

Curfew in Lonavla
(संग्रहीत)

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

लोणावळा : भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी! उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागला अस म्हणताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. दरवर्षी हाच प्रत्येय येतो. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. परंतु, नियमांची ऐसीतैसी करून नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचताच हे खरं आहे. करोनाची दुसरी लाट ओसरली, परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये, नियमांचे पालन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. परंतु, त्यांच्या या आवाहांकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं. शनिवार आणि रविवार रोजी तर हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. त्याच बरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

हे नियम कुठे लागू आहेत!

भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील व खालील बाबींना प्रतिबंध असेल.

१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.

२) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे,

३) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

४) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे,

५) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.

६) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे,

७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे,

८) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.

९) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

१०) धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी..

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-07-2021 at 14:11 IST