scorecardresearch

Video: “रवींद्र धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती, त्याचं मुख्य कारण…”, शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना मोठं विधान केलं आहे.

Ravindra Dhangekar Sharad Pawar
रवींद्र धंगेकर व शरद पवार (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना मोठं विधान केलं आहे. “रवींद्र धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (६ मार्च) पुण्यात रवींद्र धंगेकर भेटायला आले असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “कसबा निवडणुकीतील यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे. धंगेकरांना यश मिळेल, असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ.”

“हा भाजपाचा गड, असं अनेक वर्षे बोललं जातं”

“याच्या खोलात जायची गरज नाही. परंतु हा भाजपाचा गड आहे, असं अनेक वर्षे बोललं जातं. दुसरी गोष्ट तिथं अनेक वर्षे गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. बापट सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : गांधी कुटुंब नेहरू आडनाव का लावत नाही ते शरद पवार आदरणीय, पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? वाचा…

“गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सर्वांशी घनिष्ठ संबंध”

शरद पवार पुढे म्हणाले, “गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजपा आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, पुण्यातील भाजपा सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असं आम्हाला वाटत होतं.”

“बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”

“शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली. याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 10:45 IST