पिंपरी :  दुचाकी नीट चालव असे सांगितल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या दुचाकीचालकाने साथीदारांच्या मदतीने ट्रकचालकाला बेदम मारहाण करीत ट्रकची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी ( ४ फेब्रुवारी) रात्री सव्वाआठच्या सुमारास कुरुळी येथे आळंदी फाटा -स्पायसर चौकात घडली. योगीराज नारायण राठोड (वय ४१, रा. चाकण) असे मारहाणीत जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास राठोड हे ट्रक घेऊन चालले होते. आळंदी फाटा येथील सिग्नलवर त्यांचा ट्रक थांबला. त्यावेळी आरोपीने ट्रकजवळून दुचाकी नेली. त्यामुळे ट्रकचालक राठोड याने दुचाकी नीट चालव, असे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने रस्त्यातच दुचाकी उभी करून राठोड यांना शिवीगाळ करीत थोबाडीत मारली. त्यानंतर राठोड हे स्पायसर चौकात आले असता आरोपी दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी पुन्हा राठोड यांना शिवीगाळ केली. दगड फेकून मारला. तो  दगड राठोड यांच्या हनुवटीला लागून दुखापत झाली. त्यानंतर राठोड हे ट्रक घेऊन डोंगरवस्ती येथे आले असता आरोपी रिक्षातून आले. त्यांनी राठोड यांच्या ट्रकवर दगडफेक करीत ट्रकची काच तोडून नुकसान केले. पोलीस हवालदार जायभाये तपास करीत आहेत.

Story img Loader