आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीबाबत भारतीय जनता पक्षाची गांभीर्याने तयारी सुरू झाल्याचे प्रदेश बैठकीत मंगळवारी स्पष्ट झाले. बैठकीच्या पहिल्या दिवशीचे कामकाज संघटनात्मक काम याच विषयावर केंद्रित करण्यात आले होते. महाराष्ट्रात भाजपच्या ६३ हजार बूथ समित्या स्थापन झाल्या असून उर्वरित २० हजार समित्या एक महिन्यात स्थापन करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत मंगळवारी दिला.प्रदेश भाजप बैठकीत पक्षाचे सहाशे पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीच्या उद्घाटन सत्रानंतर दुष्काळी परिस्थितीबाबत एक सत्र झाले. त्यानंतर सलग चार तास पक्षाची संघटनात्मक कामाची बांधणी राज्यात कशा पद्धतीने झाली आहे, याचा सविस्तर आढावा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी घेतला. त्यासंबंधीचे निवेदन प्रत्येक जिल्हाध्यक्षांना करायला सांगण्यात आले होते. प्रत्येक मतदान केंद्र म्हणजे एक बूथ या पद्धतीने राज्यात ८३ हजार बूथ असून या प्रत्येक बूथसाठी दहा कार्यकर्त्यांची समिती नियुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम भाजपने दिला होता. त्यासंबंधीचे निवेदन बैठकीत विस्ताराने करण्यात येत होते.राज्यात ६३ हजार बूथ समित्या स्थापन झाल्या आहेत. या प्रत्येक समितीवर कोण दहा कार्यकर्ते आहेत, त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्या छायाचित्रासह संकलित करण्यात आली आहे. या माहितीचे फॉर्म बैठकीला येताना बाईंडिंग करून घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाध्यक्षांनी माहिती व फॉर्म सादर केले. नागपूर, नगर, बीड, जळगाव, तसेच सांगली व कोल्हापूर (ग्रामीण) या जिल्ह्य़ांनी शंभर टक्के बूथ समित्या स्थापन केल्याचे या निवेदनांमधून समजले. उर्वरित २० हजार बूथची रचना येत्या महिन्यात पूर्ण झाली पाहिजे, अशी सूचना फडणवीस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना या वेळी दिली. बैठकीत बुधवारी (४ सप्टेंबर) राजीवप्रताप रुडी, गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शन होणार असून बैठकीचा समारोप नितीन गडकरी करणार आहेत.