पुणे : ‘भूतकाळापासून जो माणूस स्वतःल वाचवतो तेव्हा त्याची अधोगती सुरू होते. त्याला कोणी वाचवू शकत नाही, असे वास्तव असताना काँग्रेसमधील अनेक नेते ‘ईडी’च्या भीतीने भाजपमध्ये गेले आहेत. गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे काँग्रेसीकरण केल्याचे उत्तम काम केले आहे,’ असा उपरोधिक टोला ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी लगावला. तसेच, धर्मांध असहिष्णूंनी घेरलेल्यांपासून भारताला लवकरच ‘नवस्वातंत्र्य’ मिळेल. त्यासाठी अराजकतेला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त भाई वैद्य फाऊंडेशन आणि आरोग्य सेना यांच्यातर्फे ‘लोकनेते भाई वैद्य युवानेता पुरस्कार परुळेकर यांना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना परुळेकर बोलत होते. फाऊंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यावेळी उपस्थित होते.
परुळेकर म्हणाले, ‘सध्या देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचे डोंगर उभे आहे, अलंकारिक नम्रपणाच्या आडून देशाच्या भवितव्याची चिरफाड केली जात आहे. स्वतःच्या नैतिक घसरणीचे समर्थन करणारे लोक आपले नेतृत्व करीत आहेत, हे दुर्दैव आहे. मध्यम आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनी केलेल्या त्यागातून मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. हा महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे आणि मराठी भाषेचा आहे. ज्या व्यक्तींना तुरुंगात टाकण्याची गरज आहे, ते तुरुंगाबाहेर आहेत आणि गरज असलेल्या तरुणांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात असल्याचे चित्र अनुभवास येत असून बेसुमार जंगलतोड, अदाणी समुहाला देश विकून भूतकाळात केलेली पापे झाकण्यासाठी ‘ईडी’चा वापर सुरू आहे.’