पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विद्यमान चार आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजपने पहिल्या टप्प्यातील सुरक्षित मतदारसंघातील अपेक्षित उमेदवार जाहीर केले असले, तरी ‘कसब्या’त ब्राह्मण की ब्राह्मणेतर उमेदवार द्यायचा, खडकवासला आणि वडगावशेरीपैकी कोणत्या मतदारसंघाची मित्रपक्षाबरोबर अदलाबदली करायची, या पेचामुळे मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा लांबणीवर पडली आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्येही विद्यमान आमदारांना की त्यांच्या बंधूंना उमेदवारी द्यायची, हा प्रश्न कायम राहिला आहे.
भाजपने कोथरूडमधून उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्वतीतून तीन वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे यांच्याबरोबरच भोसरीमधून आमदार महेश लांडगे आणि गृहकलह संपुष्टात आल्याने चिंचवडमधून माजी आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा केली.
चंद्रकांत पाटील यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना खासदार करण्यात आले. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिलेले आव्हान, त्यांची देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर म्यान झाल्याचे मानले जाते. माधुरी मिसाळ यांनी पर्वतीचे प्रतिनिधित्व तीन वेळा केले आहे. त्यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली असली, तरी पुणे महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी या मतदारसंघातून दावा केला होता. त्यांची राज्य कंत्राटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपने मिसाळ यांचा मार्ग निर्धोक केल्याचे मानले जाते. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता कमीच आहे.
शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतरची पहिली काही वर्षे शिरोळे यांची कामगिरी समाधानकारक नव्हती. लोकसभा निवडणुकीतही या हक्काच्या मतदारसंघात भाजपला पिछाडीवर राहावे लागल्याने शिरोळे यांच्यापुढे धोका निर्माण झाला होता. मात्र, पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांना पुन्हा संधी देण्यात आल्याचे म्हटले जाते.
शहरातील तीन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना भाजपने पारंपरिक मतदारसंघ कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट व खडकवासला या मतदारसंघांबाबतचे गूढ कायम ठेवले आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना पराभूत व्हावे लागले होते. ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांची वाट सोपी नाही. कसबा मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवार द्यावा, असा जोर वाढला आहे. त्यामुळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा, की दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल आणि शहराध्यक्ष धीरज घाटे अशी नावेही चर्चेत आहेत.
महायुतीच्या जागावाटपात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात वडगावशेरी आणि खडकवासला या मतदारसंघांची अदलाबदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासाठी भाजप वडगावशेरीत आग्रही आहे. त्यासाठी खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची भाजपची तयारी आहे. त्यातच शिवसेनेनेही (शिंदे) खडकवासला मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघात तीन वेळा आमदार असूनही भीमराव तापकीर यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. पुणे कॅन्टोन्मेंट हा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघात सुनील कांबळे विद्यमान आमदार आहेत. तसेच, या मतदारसंघातून त्यांचे बंधू, माजी आमदार दिलीप कांबळे हेही इच्छुक आहेत. त्यापैकी दिलीप कांबळे यांची महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे, तर विद्यमान आमदारांबाबत कार्यकर्त्यांची नाराजी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीही अजून नक्की झालेली नाही.