पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवारांना शिवीगाळ करुन गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीममगर परिसरात रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी नीलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (१० जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आरोपी धेंडे, भिमाले, कांबळे, शिंदे आले होते.
भाजपचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार तेथे होते. त्या वेळी आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द उच्चारले. त्यानंतर आरोपी सागर कांबळे हा उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कांबळेला रोखले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम नामावडे, उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक चौगले तपास करत आहेत.
निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी शहरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. मतदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाब आणणे, निवडणूक, मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्यास कावराई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. कोथरूडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणेची पत्नी महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार आहे. मारणे याने काहींना दूरध्वनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मारणे याला समज दिली.
आचारसंहितेचे पालन, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातील सराइतांच्या हालचालीवर नजर ठेवली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील साडेपाच हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. बाणेर परिसरात मतदारांना प्रलोभन दाखविणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून दुचाकी, तसेच अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
पुणे महापालिकेची निवडणुकीत १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. शहरातील ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीत ११५५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी चार हजार ११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, त्यापैकी ९०६ मतदान केंद्र संवेदनशील आहे. या संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.. मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी चार हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे.
