पुण्यातली करोना परिस्थिती हाताळण्याबाबत चंद्रकांत पाटलांच्या अजित पवारांना सूचना; पत्र लिहित म्हणाले,…

वेळोवेळी इतर सूचना करेनच व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करेन याची खात्री असावी, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना काही उपाययोजना सुचवल्या आहेत. पुण्यातल्या करोना पार्श्वभूमीवर बेसावध राहून चालणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत. या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे –

  • परगावचे हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी राहत आहेत. यापैकी अनेकांना करोनाची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे छोट्या घरात आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या असंख्य लोकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांना स्वतंत्र खोली नसल्याने गृह विलगीकरणात राहता येत नाही व असे रुग्ण संसर्गास कारणीभूत ठरत आहेत. त्यासाठी प्रशासनाने कोविड केअर सेंटर्स (म्हणजे विलगीकरण केंद्र) सुरू करावीत व रुग्णांना तेथे उपचार द्यावेत.
  • ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार लवकरच निर्णय घेत आहे. पण ही लस सुरक्षित आहे, त्यामुळे मुलांना गंभीर स्वरूपाचा करोना संसर्ग होणार नाही, अशाप्रकारचे प्रबोधन प्रशासनाने आणि शाळांनी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आत्तापासूनच सुरू करणे आवश्यक आहे.
  • शाळा सुरू झाल्यानंतर जी मुले करोनाबाधित होतील त्यांच्या उपचाराचा खर्च प्रशासनाने करावा. तसेच आजारातून पूर्ण बरे झाल्यावर, ७ किंवा १० दिवसांनी विद्यार्थी परत शाळेत येऊ लागेल याची खबरदारी घ्यावी.
  • गृहविलगीकरणात असलेल्या लोकांनी ७ दिवस संपण्याच्या आत बाहेर पडू नये यासाठी काही यंत्रणा सुरू करावी. मागील वेळेस अशा घरांवर विलगीकरणाचे पत्रक आणि त्या बाधित व्यक्तींच्या हातांवर शिक्के मारले होते. त्यामुळे हे प्रमाण खूप कमी झाले होते. यंदा मात्र सौम्य लक्षणे असल्यामुळे अनेक रुग्ण बाहेर जात असून ते Silent Spreader ठरत आहेत.
  • ज्या वस्त्या, हाउसिंग सोसायट्या, मोठी खाजगी ऑफिसेस, बॅंका वगैरे १०० टक्के लसीकरण करतील त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर काही पुरस्कार ठेवावेत आणि त्यांचा गौरव करावा. जेणेकरून १००% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल व या संकटावर मात करता येईल.
  • पुन्हा एकदा कोविड १९ त्रिसूत्रीच्या वापराबद्दल जनजागृती आणि त्याच्या कठोर अंमलबजावणीवर भर द्यावा. म्हणजे मास्क वापर, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे (सॅनिटायझर वापरणे ) यावर भर द्यावा.
  • तसेच सध्या बाजारात सहज उपलब्ध असलेल्या सेल्फ टेस्टिंग कीटचा वापर वाढला असून नागरिक घरीच स्वतःची तपासणी करत आहेत, यातून रुग्णसंख्येची आकडेवारी तर लक्षात येत नाहीच पण असे बाधित रुग्णदेखील संसर्गास कारणीभूत ठरत आहेत. याबाबत ही ठोस निर्णय घेण्यात यावा.


वेळोवेळी इतर सूचना करेनच व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करेन याची खात्री असावी, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp chandrakant patil ajit pawar pune covid 19 wrote a letter vsk

Next Story
पुण्यात ४४ गावं कोविडमुक्त, अजित पवारांकडून संपूर्ण पुणे विभागात अभियान राबवण्याचे निर्देश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी