ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका आरती कोंढरे यांना गुरुवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने ससूनमधील डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी आरती कोंढरे यांच्याविरोधात डॉक्टर संरक्षण कायदा हे कलम न लावल्याने त्यांना जामीन मंजूर झाल्याचा ‘मार्ड’चा आरोप असून पोलिसांनी या कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अन्यथा संपावर जाणार, असा इशारा संघटनेने दिला आहे.

मंगळवारी मध्यरात्री रुग्णालयातील आपात्कालीन उपचार कक्षात सहा डॉक्टर नेमणुकीस होते. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास भाजपा नगरसेविका आरती कोंढरे रुग्णालयात गेल्या. त्यावेळी डॉ. स्नेहल खंडागळे (वय २६) या एका रुग्णावर उपचार करत होत्या. तेव्हा कोंढरे यांनी रुग्णालयातील कक्षात आरडाओरडा करायला सुरुवात केली. तसेच डॉ. खंडागळे यांना एका रुग्णावर तातडीने उपचार करा, असे सांगितले. यावरुन कोंढरे यांनी डॉ. खंडागळे यांच्याशी वाददेखील घातला आणि त्यांनतर खंडागळे यांना मारहाण केली. याप्रकरणी खंडागळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच कोंढरे यांच्यावतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने कोंढरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

आरती कोंढरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर होताच ‘मार्ड’ संघटना आक्रमक झाली आहे. पोलिसांनी डॉक्टर संरक्षण कायदा हे कलम न लावल्याने कोंढरे यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे पोलिसानी डॉक्टर संरक्षण कायदा हे कलम लावून त्यांच्यावर कारवाई करून अटक करावी अन्यथा उद्या पासून ससूनमधील मार्ड संघटनेचे डॉक्टर संपावर जातील, असा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.