पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचा फलक लावण्यावरुन झालेल्या वादातून टोळक्याने कांबळे याच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी १४ ते १५ जणांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शंतून पांडूरंग उर्फ बापू कांबळे (वय ३०, रा. एसआरए वसाहत, लोहियानगर, महात्मा फुले पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत कासेवाडी-भवानी पेठ प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मृणाल कांबळे निवडून आल्या. विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी गुरुवारी (२२ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास कासेवाडी भागात कांबळे यांचे कार्यकर्ते फलक लावत होते. त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक अर्चना पाटील यांचे पती तुषार पाटील यांचे कार्यकर्ते तेथे आले. या भागात फलक लावू नका, असे शंतनू कांबळे यांना सांगण्यात आले. टोळक्याने शंतून कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. कासेवाडीत फलक लावल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असे शंतनू कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.
