“हे मला नाही सर्व पुणेकरांना डावलल्यासारखं झालं”; मंत्रालयातल्या बैठकीवरुन भाजपा मविआ आमने-सामने

पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला न बोलावल्याने महापौर मोहोळ नाराज

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रण होतं पण पुण्याच्या महापौरांनाच आमंत्रण नव्हतं. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन आता भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे.

महापौर मोहोळ यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही.


उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत. गेल्या चार वर्षांत झालेली पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे. मात्र आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच!


अजित पवारांनी मंत्रालयामध्ये बोलावलेल्या या बैठकीत राज्य मंत्रिमंडळातले आठ मंत्री, पाच खात्यांचे सचिव पुणे महापालिकेचे आयुक्त त्याचप्रमाणे पुणे महापालिकेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यादेखील उपस्थित राहणार आहेत. मात्र खुद्द पुण्याच्या महापौरांनाच निमंत्रण नाही.

विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण दिलं असलं तरी भाजपच्या कोणत्याही प्रतिनिधीला किंवा महापौरांना आमंत्रित केलेलं नाही. यावरुन स्पष्ट दिसतं की, पुणे महापालिकेत सत्ता जरी भाजपची असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असतात. हे निर्णय घेताना अजित पवार पूर्णपणे त्यांच्या अधिकारांचा वापर करतात, अशी टीकाही भाजपाने केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp criticises ajit pawar for not inviting mayor murlidhar mohol for meeting about pune vsk

ताज्या बातम्या