scorecardresearch

मावळमध्ये बैलगाडा शर्यतीत पहिला क्रमांक येताच फडणवीसांचा जल्लोष; म्हणाले “माझा नेहमीच पहिला क्रमांक, पण…”

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील मावळ येथे आयोजित बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील मावळ येथे आयोजित बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील मावळ येथे आयोजित बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली. अ.भा. बैलगाडा संघटना मावळ तालुका तसंच मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीतर्फे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचाही बैलगाडा या शर्यतीत धावला आणि पहिल्या क्रमांकावर आला. यानंतर फडणवीसांनी जल्लोष करत आपला नेहमीच पहिला क्रमांक येतो म्हणत ठाकरे सरकारला टोला लगावला.

तुकाराम बीज आणि तिथीनुसार शिवजयंती असे दुहेरी औचित्य साधून हे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रवी भेगडे, रवी शेट्ये आणि इतरही सहकारी उपस्थित होते. आपल्या बैलांनी बाजी मारल्यानंतर फडणवीस म्हणाले की, “माझा बैलगाडादेखील या ठिकाणी धावला आणि पहिल्या नंबरला आला. तुम्ही ठरवलं की माझा नंबर पहिला येतोच”.

पुढे बोलताना महाविकास आघाडीला टोला लगावत ते म्हणाले की, “तुम्ही २०१४, २०१९ ला देखील आणला होता. पण काही लोकांनी तीन मार्कशीट जोडल्या आणि आपला नंबर पहिला केला. पण काळजी करु नका कारण तुमच्या मनात आम्हालाच पहिला क्रमांक द्यायचा होता आणि तुम्ही तो दिला होता. आता बैलगाडा पहिला आला असून मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला त्याला कोणीच थांबवू शकत नाही”.

फडणवीसांनी यावेळी शर्यतबंदीवरुनही महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “२०१३ मध्ये जेव्हा बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली त्यानंतर राज्यात आमचे सरकार आले आणि आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ही बंदी मागे घेतली. पुन्हा बंदी आली तेव्हा तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी यात लक्ष घालून एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतु पुन्हा या शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याने २०१७ मध्ये विधानसभेत आम्ही एक कायदा केला आणि या शर्यती सुरू केल्या. पण न्यायालयाने पुन्हा बंदी घातल्याने आम्ही पुन्हा केंद्राकडे पाठपुरावा केला. शतकानुशतके जुनी ही परंपरा खंडित होऊ नये हीच तीव्र इच्छा होती”.

‘रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल’ म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रीय अहवाल आम्ही त्यानंतर तयार करून तो कोर्टात सादर केला. आता सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे, तो या अहवालावरूनच दिला आहे, याचा मला आनंद विशेष वाटतो असंही फडणवीस म्हणाले. जे लोक बैलगाडा शर्यतीवर बंदी आणायचा विचार करता त्यांनी एकदा मावळमध्ये येऊन उत्साह पहावा असंही यावेळी ते म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp devendra fadanvis targets mahavikas aghadi after winning bull cart race in maval pune sgy

ताज्या बातम्या