पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगत विकास कामामध्ये विनाकारण अडथळा आणत असल्याचा आरोप करत भाजपच्या माजी नगरसेविकेने गुरुवारी तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला चपलेले चोप दिला. नगरसेविकेने पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कार्यकर्त्याला चोप दिल्याने खळबळ उडाली. माहिती अधिकाराचा वापर करणारी व्यक्ती शहर काँग्रेसच्या नेत्याच्या जवळची असल्याचे बोलले जात आहे.
पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर भागात अदिवासी मुलींच्या वसतिगृहाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका विशेष प्रयत्नशील आहेत. गेल्या काही वर्षापासून त्या या प्रकल्पासाठी आग्रही असून पालिकेत सतत पाठपुरावा करत आहेत. या वसतिगृहाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून अंतर्गत सोयी सुविधांचे काम बाकी आहे.
हेही वाचा >>> जिल्ह्यात महायुतीला धक्का? माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा
वसतिगृहाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन कोटी रूपयांच्या कामाची वर्क ऑर्डर पालिकेने दिलेली नाही. ही वर्क ऑर्डर लवकर द्यावी, यासाठी संबधित माजी नगरसेविका महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. तेथे त्या अधिकाऱ्याशी बोलत असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणविणारी ही व्यक्ती तेथे आली. त्यावेळी नगरसेविका आणि त्याची शाब्दिक चकमक उडाली. यानंतर चिडलेल्या भाजप नगरसेविकेने थेट या कार्यकर्त्याला चपलेनेच चोप दिला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ महापालिकेच्या भवन विभागामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा >>> बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय
हा प्रकार घडला त्यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष देखील महापालिकेत हजर होते. त्यांनी तातडीने तेथे धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हा कार्यकर्ता शहरातील काँग्रेस नेत्याच्या जवळचा असल्याचे बोलले जात असून तो राजकीय लोकांचे पाठबळ घेऊन माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करून अधिकाऱ्यांना देखील त्रास देत असल्याल्या काही तक्रारी यापूर्वी समोर आल्या होत्या, अशी चर्चा महापालिकेत सुरु आहे. या महिला नगरसेविकाचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या अदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या कामात देखील ही व्यक्ती माहिती अधिकार कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून विनाकारण अडथळा आणत होता. हा प्रकल्प रखडला जावा, यासाठी त्याने काही पत्र देखील पालिकेत दिली होती. त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.