पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपमध्ये महापौरपदावरून नाराजी उफाळून आली. महापौरपदासाठी इच्छुक असताना उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज शीतल शिंदे अर्ज दाखल न करताच महापालिका मुख्यालयातून बाहेर पडले. महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी ऐनवेळी शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल झाला. महापौरपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

महापाैरपदाचे आरक्षण खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. रवि लांडगे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे, तुषार हिंगे महापौरपदासाठी इच्छुक होते. महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी (२ फेब्रुवारी) अर्ज दाखल करण्याची मुदत होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांचे नाव निश्चित केले. त्याबाबतचे पत्र शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठविले.

महापौरपदाऐवजी उपमहापौरपदाची उमेदवारी दिल्याने नाराज झालेले शिंदे तडकाफडकी महापालिका मुख्यालयातून बाहेर पडले. त्यांनी अर्ज भरण्यास नकार दिल्याने स्थानिक भाजपने उपमहापौरपदासाठी चार नगरसेवकांची नावे प्रदेश नेतृत्वाला पाठवली. त्यानंतर निगडी, प्राधिकरणाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या शर्मिला बाबर यांचा उमेदवारीअर्ज दाखल करण्यात आला. महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे उमेदवारीअर्ज दाखल करण्यात आले. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपचे गटनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक अमित गावडे या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ उपमहापौरपदासाठी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने केवळ उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आकुर्डीचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केल्याचे काळभोर यांनी सांगितले. नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका अरुणा लंगोटे, विशाल काळभोर या वेळी उपस्थित होते.

शुक्रवारी निवडणूक

महापाैर-उपमहापाैरपदासाठी शुक्रवारी (६ फेब्रुवारी) निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा हाेणार आहे. सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून सहकार आयुक्त दीपक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवि लांडगे यांचा एकमेव अर्ज असल्याने महापौरपदी त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून, शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब होईल. उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

अर्ज भरताना शहराध्यक्ष गैरहजर

महापौरपदासाठी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे इच्छुक होते. परंतु, त्यांना संधी मिळाली नाही. महापौर, उपमहापौरांचा अर्ज दाखल करताना काटे गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कोण आहेत रवि लांडगे?

रवि लांडगे हे भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत. प्रभाग सहा धावडेवस्ती-भगतवस्तीमधून ते दोन वेळा नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेतील एकही पद न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपमध्ये आले आणि बिनविरोध निवडून आले. आता महापौरपदीही त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

पक्षीय बलाबल
भाजप – ८४
राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) – ३७
शिवसेना (शिंदे) – ६
अपक्ष – १

उपमहापौरपद मागितले नव्हते. त्यामुळे अर्ज भरला नाही, असे भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले. महापौरपदासाठी इच्छुक होतो. पक्षाचा निर्णय मान्य आहे. नाराज नसून मुंबईवरून येण्यास विलंब झाल्याने महापौर, उपमहापौरांचा अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हतो, असे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

महापौर, उपमहापौरपदाचा निर्णय प्रदेश पातळीवर झाला आहे. कोणीही नाराज नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल केला आहे. महापौरपद किती कालावधीसाठी असेल, हे वरिष्ठ पातळीवर ठरवले जाईल, असे गटनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.