पिंपरी- चिंचवड: भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्या विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन दिवसांपूर्वी बाळा भेगडे आणि विनोद पोखरकर यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. पोखरकर यांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात भेगडे यांनी तक्रार दिली आहे. तळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी २ ऑगस्ट रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून मराठा मोर्चाचे पदाधिकारी दुखावले गेले. विनोद पोखरकर यांनी बाळा भेगडे यांना फोन करून जाब विचारला होता. धमकी वजा इशारा दिला होता. त्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. भेगडे यांनी बदनामी झाल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. स्वतः बाळा भेगडे यांनी याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दिली आहे. हेही वाचा: Pune : लोकांना घाबरवण्यासाठी रेस्तराँमध्ये गोळीबार, मुळशीतला बांधकाम व्यावसायिक गजाआड नेमकं माजी राज्य मंत्री बाळा भेगडे काय म्हणाले होते? भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळमधील भाजपच्या मेळाव्यात 'मनोज जरांगे पाटील' यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. महाविकास आघाडीची सुपारी घेऊन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप माजी राज्य मंत्री बाळा भेगडे यांनी केला होता.