पुणे शहरातील एफसी रोड परिसरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये मध्यरात्री काही अल्पवयीन मुलांनी ड्रग्स सेवन करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी हॉटेलमधील साहित्य जप्त करत काहींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात बोलताना आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल करत कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत”, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? किंवा त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत”, असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. मात्र, त्यानंतर पुन्हा या विधानावरून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते पुढं म्हणाले, “अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी १४ लाख होती. आता ७० लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण , रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : धक्कादायक! पुण्यातील हाॅटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचे ड्रग्स सेवन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थाचा विषय चांगलाच गाजत आहे. आज काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर टीका केली. यावर प्रत्युत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, “अशा प्रकारच्या सर्व घटनांना थेट मंत्र्यांना जबाबदार धरणं योग्य नाही. जर मंत्र्यांची इनव्हॉलमेंट असल्याचं सिद्ध झालं तर अशा पद्धतीने बोलायला हरकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

रविंद्र धंगेकर काय म्हणाले होते?

“पुणे शहर आणि आसपासच्या भागात पहाटे 3 वाजेपर्यंत पब चालवले जात आहेत. या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पब चालकांची यादी वाचून दाखविली होती. आता पुन्हा ती वेळ आणू नका, पोलिसांनी पब चालकांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. तसेच मंत्री शंभूराज देसाई हे केवळ कारवाई करु, असं आश्वासन देतात. मात्र ते काही करत नसून ते कसाई सारखे वागतात”, अशा शब्दांत आमदार रविंद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chandrakant patil on pune fc road drugs case video and pune district guardian minister ajit pawar gkt
First published on: 23-06-2024 at 21:24 IST