सध्या देशात आणि राज्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील मोठ्या शहरांनाही याचा फटका बसला आहे. दरम्यान, पुण्यातही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते खासदार गिरीश बापट यांनी लवासामधील जागा कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. पुणे मिररनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जिल्हा प्रशासनाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बेड्स तयार करण्यासाठी शाळा, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. परंतु यादरम्यान गिरीश बापट यांनी लवासाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. तसंच यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं असून कोविड केअर सेंटरसाठी लवासाच्या जागेचा वापर करण्याचंही सूचवलं आहे. यापूर्वी मुळशी तालुक्यातील लवासा येथे कोविड केअर सेंटर तातडीनं उभारण्यात यावं अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली होती. त्यासंबंधीचं निवेदन मारणे यांनी गिरीश बापट यांच्याकडे दिलं होतं. त्यानंतर बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीनं कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठवलं होतं. मुळशी तालुक्यात करोनाबाधितांची संख्याही वाढत असून तालुक्यातील लोकांसाठीच बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मागणी करण्यात आली.

“लवासामधील जागा सध्या रिक्त आहे आणि करोनाविरोधातील लढ्यात या जागेचा वापर करता येई शकतो. शहरातील रुग्णालये, हॉटेल आणि अन्य मालमत्ता आपण ताब्यात घ्याव्यात अशी मी विनंती करत आहे. रुग्णांसाठी बेड्स आणि करोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो,” असं बापट यांनी पत्रात नमूद केलं आहे.

“लवासामध्ये अनेक इमारतींसोबतच सुविधांनी परिपूर्ण असं एक रुग्णालयदेखील आहे. फारच कमी लोकं त्या ठिकाणी राहत आहे. करोनाबाधितांना क्वारंटाइन करण्यासाठी ती जागा चांगली ठरू शकते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसंच ज्या प्रमाणे त्या ठिकाणी रुग्णालय उपलब्ध आहे त्यामुळे पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. मुळशीतील करोनाबाधित रुग्णांवर त्या ठिकाणी उपचार केले जाऊ शततात,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. परंतु, या जागेचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून या प्रस्तावाचा निषेध करण्यात येत असल्याचंही त्यांनी कबूल केलं.

“त्याचं कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर झाल्यास आपल्याला करोना विषाणूची बाधा होईल आणि शहरात त्याचा प्रसार होईल अशी भीती नागरिकांच्या मनात आहे. परंतु आम्ही रिक्त असलेल्या मोठ्या जागांबाबत बोलत आहोत. त्यामुळे करोनाचा प्रसार होण्याचीही भीती कमी आहे. आम्ही केवळ अशाप्रकारच्या तयार पायाभूत सुविधांचा वापर करू इच्छितो, असा आग्रह बापट यांनी धरला.

जिल्हाधिकारी म्हणतात…

परंतु जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेविषयी शंका उपस्थित केली आहे. “लवासा हे ठिकाण फार दूर असून काही अडचणीदेखील आहेत. विविध बाबींचा विचार केल्यानंतरच अशा सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आगे. गिरीश बापट यांनी काही सूचना केल्या आहेत. जेव्हा गरज असेल त्यावेळी आम्ही याबाबत निर्णय घेऊ,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.