पिंपरी-चिंचवड: मावळचे आमदार सुनील शेळकेंच्या अडीच- अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाला विरोध करत भाजप पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचं भाजपच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. त्या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

लोणावळ्यात महायुती तुटली आहे. अशी माहिती भाजपच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी दिली आहे. आमदार सुनील शेळकेंचा फॉर्म्युला त्यांना पटला नाही. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा एकही नगरसेवक नसलेल्या पक्षाला लोणावळा नगराध्यक्ष पद देण्यासाठी त्यांचा विरोध आहे. भाजपने एकला चलोचा नारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी हिरवा कंदील दिला असल्याचं देखील सुरेखा जाधव यांनी म्हटलं आहे. आमदार सुनील शेळके आणि आमचं जमणार नाही. अस स्पष्टपणे वरिष्ठांना सांगितलं आहे. “आमचं ठरलं आहे. आता स्वतंत्र लढणार,” अस सुरेखा जाधव यांनी म्हणत आमदार सुनील शेळकेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.