पिंपरी: महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर फक्त झोपाच काढल्या, अशी टीका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

वडगाव मावळ येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर पाटील यांनी भोसरीत भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि लांडगे परिवाराचे सांत्वन केले.

पाटील म्हणाले,की माझा तो बाब्या, असे शिवसेनेचे धोरण आहे. अडीच वर्षांत त्यांनी काहीच केले नाही. २०१९ मध्ये शिवसेनेने केलेला विश्वासघात सर्वश्रुत आहे. २०१९ मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा आधार घेत विजय मिळवला, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणे सुरू केले आहे. मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे यांनी झोपाच काढल्या. दुसरे काही केले नाही.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी आघाडी केली. नागरिकांची स्मरणशक्ती चांगली असते. अशा गोष्टी त्यांच्या लक्षात असतात, असेही पाटील म्हणाले.

पुण्यात माझ्या वक्तव्याचा एका वाहिनीकडून विपर्यास करण्यात आला. ती ‘ब्रेक्रिंग न्यूज’ पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तत्काळ दूरध्वनी आला. असे मी काही बोललो नाही असे मला त्यांना सांगावे लागले, असे पाटील यांनी सांगितले.

 ‘त्यांच्या पक्षाची चिंता त्यांनी करावी’

शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यावरून शिवसेनेत सुरू असलेल्या वादाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले,की तो त्यांचा अंतर्गत वाद आहे. त्यांच्या पक्षांची चिंता त्यांनी करावी. आमच्या पक्षाची चिंता आम्ही करू. पंकजा मुंडे स्वप्नातही नेत्यांच्या विरोधात अशा प्रकारचे विधान करणार नाहीत. यात ‘ध’चा ‘मा’ करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठी गैरसमज करून घेणार नाहीत. नवरात्र आणि दिवाळी निर्बंधमुक्त उत्सव असतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला. अतिरेक केला तर निर्बंध येतात, अशी सूचक टिप्पणी पाटील यांनी केली.