पुणे : औंध, बाणेर, बालेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरील आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) चौकात उड्डाणपूल उभारला जात आहे. या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होणार आहे. यापूर्वी उभारण्यात आलेल्या उड्डाणपणामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला नव्हता.

या रस्त्यावरून मेट्रो धावणार असल्याने त्यासाठी नव्याने पूल उभारणे गरजेचे होते. त्यामुळे येथील जुना उड्डाणपूल पाडून तेथे नव्याने उड्डाणपूल उभारणार येत आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे या कामासाठी आग्रही होते. त्यांच्या पुढाकारातून हे काम सुरू करण्यात आले होते. औंध काढून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या गणपती एक बाजू वाहतुकीसाठी खुली देखील करण्यात आली आहे. तर दुसरा बाजूचे काम सध्या सुरू आहे.

‘गणेशखिंड रस्त्यावरील आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) चौकातील उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात यावे,’ अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील पुलाला अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी करून या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी विनंती सुनेत्रा पवार यांना केली.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील अनेक वाड्या-वस्त्यांवर महावितरणच्या ओव्हरहेड वायर्स आहेत, त्या धोकादायक असल्याने भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली. पुणे आणि खडकी कटक मंडळाचे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असेही आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.

नगरसेवक बहिरट यांचीही मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या पुलाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांनी गेल्या आठवड्यात केली होती. महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच पीएमआरडीएचे अध्यक्ष योगेश म्हसे यांच्याकडे बहिरट यांनी ही मागणी केली आहे. तसेच, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत देखील बहिरट यांनी उड्डाणपुलाला नाव देण्याची मागणी केली होती.