पिंपरी-चिंचवडकरांना पुरेसा पाणीपुरवठा नाहीच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा डिसेंबर २०२१ अखेपर्यंत उपलब्ध करण्याचा सत्ताधारी भाजपचा दावा फोल ठरल्याचे सांगत भाजपचा नाकर्तेपणा आणि चुकीच्या नियोजनामुळेच शहरातील पाणीसमस्या बिकट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर, १५ वर्षे पालिका ताब्यात असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पाणीप्रश्न निकाली काढण्यात अपयशी ठरली असून त्याचे खापर मात्र ते इतरांवर फोडत आहेत, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहराची २०५० पर्यंतची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन राज्य सरकारने २०११ मध्ये आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी असा एकूण २६७ एमएलडी पाणी कोटा मंजूर केला होता. या दोन्ही धरणातून पिंपरी-चिंचवड शहरात पाणी आणले जाणार असून त्यादृष्टीने आवश्यक कामे सुरू आहेत. प्रत्यक्षात, २०२२ उजाडले तरी पिंपरी पालिकेकडून ते पाणी उचलण्यास सुरुवात झालेली नाही. ही दिरंगाई कोणामुळे झाली तसेच पाणीपुरवठय़ासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे  कोणामुळे दुर्लक्ष झाले, या मुद्दय़ावरून सध्याचे सत्ताधारी भाजप आणि यापूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून आंद्रा व भामा आसखेड धरणात शहरासाठी पाणी कोटा आरक्षित करून ते पाणी आणण्याचे नियोजन सुरू केले होते. भाजपला त्यांच्या कार्यकालात ते पूर्णत्वास नेणे जमले नाही. डिसेंबर २०२१ पर्यंत शहरासाठी अतिरिक्त पाणी आणण्याच्या वल्गना त्यांनी केल्या. प्रत्यक्षात या मुदतीतही शहराला पाणी मिळालेले नाही. यासाठी पूरक असलेल्या चिखलीत सुरू असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राचे कामही पूर्ण झालेले नाही. या केंद्रास विलंब होऊन पर्यायाने  शहराला अतिरिक्त पाणी न मिळण्यास भाजपच जबाबदार असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. राष्ट्रवादीचे आरोप भाजपने फेटाळले आहेत. पाणीपुरवठय़ाचा विषय खऱ्या अर्थाने भाजपने मार्गी लावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर होते, तेव्हाच यासंदर्भातील आवश्यक मंजुरी मिळाली होती. पाण्याचा वाढीव कोटा आम्हीच मंजूर करवून घेतला. चिखलीत जागा ताब्यात घेऊन पूरक कामांना सुरुवातही केली, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात शहरात दिवसातून दोन वेळा आणि दररोज पाणीपुरवठा केला जात होता. २४ तास पाणी देण्याचे नियोजनही त्यावेळी सुरू होते. भाजपने शहरातील पाणीप्रश्न बिकट बनवला. पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना एकवेळ देखील पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. दिवसाआड पाणीपुरवठय़ावरून नागरिक नाराज आहेत. भाजपने नागरिकांचा विश्वासघात केलेला आहे.

– संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आतापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यात चिखली केंद्रातून अतिरिक्त पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. राष्ट्रवादी नेत्यांना भाजपवर टीका करण्याचा नैतिक अधिकारच नाही. मावळातील पवना बंदनळ योजनेसाठी जागा ताब्यात नसतानाही राष्ट्रवादीने कोटय़वधी रुपये खर्च केले. अद्याप तो प्रकल्प सुरू देखील होऊ शकलेला नाही. राष्ट्रवादीने त्यांच्या अपयशाचे खापर भाजपवर फोडू नये.

– नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते, पिंपरी पालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ncp clash over water issue ysh
First published on: 26-01-2022 at 00:22 IST