पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत सिंहगड रस्त्यावरील प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध निवडून आलेल्या मंजूषा नागपुरे यांचे नाव महापौरपदासाठी भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे. नागपुरे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपची दुसऱ्यांदा महापालिकेत सत्ता आली असून यंदाचे महापौर पद खुला महिला यासाठी राखीव झाले असल्याने महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता होती. भाजपकडून महापौर पदासाठी नागपुरे यांच्यासह वर्षा तापकीर, मानसी देशपांडे यांच्या नावाची चर्चा होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नागपुरे यांच्या नावावर मंगळवारी सकाळी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर नागपुरे यांनी महापौर पदासाठीचा अर्ज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल केला.
महापौर पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार ) पक्षाकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याची चर्चा होती. मात्र महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबरच कॉंग्रेस पक्षाने देखील महापौर पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे येत्या ९ फेब्रुवारी ला सभागृहात मतदान होऊन नवीन महापौर पदाची निवड होणार हे निश्चित झाले आहे.
महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ फेब्रुवारीला होणार आहे. या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू करतानाच पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देतात. त्यानंतर अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवून सभागृहात मतदान होते. महापालिकेवर भाजपचे ११९ नगसेवक निवडून आले आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे यांचा विजय निश्चिच मानला जात आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार असून, स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त केला जात आहे.
नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळविला आहे. महापालिकेतील त्यांचा कामाचा अनुभव, पक्षातील कार्य आणि संघटनात्मक कामकाजाची जाण लक्षात घेता त्यांच्या नावावर एकमत झाले. मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी, भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे.
दरम्यान, उपमहापौर पदासाठी भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून महापौर पदासाठी शीतल सांवत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांचे नाव निश्चित केले आहे. या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे व उपमहापौर पदासाठी साहिल शिवाजी केदारी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
भाजपच्या सर्व नेत्यांनी विश्वास ठेवून महापौर पदाची मोठी संधी दिली आहे. महापौर पद हे केवळ उपभोगण्यासाठी नव्हे तर पुणेकरांची सेवा करण्यासाठी मिळालेली संधी आहे. त्यामुळे पुणेकरांना हेवा वाटेल त्याप्रमाणे काम करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची खूप इच्छा होती. परंतु ते आपल्यामध्ये आज नाहीत, याची मोठी उणीव जाणवत आहे. महापौर पदावर काम करताना सर्वांचे मार्गदर्शन, साथ हवी आहे. तसेच जेन झींची मते विचारात घेवून काम करणार आहे. – मंजुषा नागपुरे, महापौर पदाच्या उमेदवार, भाजप.

