विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून भाजपची ‘बूथ बांधणी’

पिंपरीतील तीनही जागा जिंकण्याचे नियोजन

पिंपरी भाजपच्या वतीने पिंपळे गुरव येथे बूथ विस्तारकांचा मेळावा घेण्यात आला.

पिंपरीतील तीनही जागा जिंकण्याचे नियोजन

पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभेच्या तीनही जागाजिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील सुमारे दीड हजार बूथवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीत बूथ बांधणीचे काम समाधानकारक नसून, नेत्यांचाच हात आखडता असल्याने कार्यकर्तेही फारसा उत्साह दाखवत नाहीत. त्यामुळेच वेळप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाने दम देऊन सर्वाना कामाला जुंपण्याकडे स्थानिक नेत्यांचा कल आहे.

राज्यात केव्हाही निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता गृहीत धरून राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. पिंपरी पालिकाजिंकल्यानंतर भाजपला शहरातील तीनही मतदारसंघजिंकायचे आहेत. सध्या चिंचवडचे प्रतिनिधित्व करणारे लक्ष्मण जगताप हे भाजपचे एकमेव आमदार आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे अपक्ष निवडून आले आहेत. तर, पिंपरीची जागा शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांच्याकडे आहे. यापुढे भाजपला ‘स्व’बळावर सत्ता आणायची असल्याने एकेक जागा महत्त्वाची आहे. पिंपरी पालिकाजिंकली असल्याने उत्साह दुणावलेल्या भाजपला आता शहरातील तीनही जागाजिंकण्याचे भाजपचे नियोजन आहे. पक्षीय पातळीवर सध्या प्रचंड बेबनाव आहे. मतभेद बाजूला ठेवून संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देण्यात आले आहे. रविवारी (२५ जून) कासारवाडीतील गंधर्व गरिमा लॉन्स येथे बूथ विस्तारकांचा मेळावा घेण्यात आला. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे आदी उपस्थित होते. शहरातील ७०० बूथमध्ये ११ जणांची कार्यकारिणी तयार झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. येत्या १५ दिवसांत बूथचे काम पूर्ण करण्याचे आदेश शहराध्यक्ष जगतापांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, या मेळाव्यात सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले.

नुसतेच मिरवणारे नेते

शहर भारतीय जनता पक्षात तीव्र गटबाजीचे राजकारण असून स्थानिक नेत्यांचा ‘शह-काटशह’ सुरू आहे. नेते म्हणून मिरवणारे संघटनात्मक कामात फारसे स्वारस्य दाखवत नाहीत. पक्षाच्या कामात ‘हातभार’ लावत नाहीत, अशा वपर्यंत तक्रारी गेल्या आहेत. अलीकडेच दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp preparation for assembly elections in pune