पुणे : ‘महापालिकेत सत्ता असतानाही अधिकारी ऐकत नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. सर्वसाधारण सभेतही बोलून दिले जात नाही. अधिकाऱ्यांच्या डोक्यावर पदाधिकाऱ्यांचा हात असल्याने ते जुमानत नाहीत. त्यांच्या डोक्यावरचा हात काढला पाहिजे. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे सोडून द्या,’ अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत केली.
महापालिकेत पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये असलेल्या गटबाजीमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या अनेक नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांकडे गाऱ्हाणे मांडून महापालिकेत मिळत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सांगितले.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी महापालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांशी संवाद साधला. ‘आठ ते दहा दिवस चकरा मारल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी भेटत नाहीत. कामे होत नाही. प्रभागातील नागरिक प्रश्न सुटत नसल्याने जाब विचारतात,’ अशी तक्रार या बैठकीत नगरसेवकांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘महापालिकेत निवडून येऊन सहा-सात महिने झाले. मात्र, नागरिकांना सांगता येईल अशी ठोस कामे होत नाहीत. जुन्या ठेकेदारांचीच मक्तेदारी सुरू आहे. प्रभागातील राजकीय हस्तक्षेपामुळे काम करताना अडचणी येतात. वरिष्ठ अधिकारी उद्धटपणे बोलतात. निधी वाटपात दुजाभाव केला जातो. ठरावीक नगरसेवक आणि प्रभागांना विशेष वागणूक दिली जाते,’ अशा तक्रारी बैठकीत करण्यात आल्या.
‘सत्ताधाऱ्यांसारखे वागा’
‘महापालिकेत आपण सत्तेत आहोत, या मानसिकतेत तुम्ही दिसत नाही. पुणेकरांनी आपल्याला कौल दिला आहे. सत्ताधारी आहोत, हे आधी मनाशी पक्के करा,’ अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी नगरसेवकांना सुनावले. महापालिकेत काम करताना केवळ प्रभाग, अपुरा निधी आणि अधिकाऱ्यांच्या तक्रारींपुरते मर्यादित न राहता पक्ष, संघटना आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, ‘महापालिकेत सत्ता असूनही निधी मिळत नाही किंवा कामे होत नाहीत, असे आपणच बोलत बसलो, तर विरोधक त्याचा फायदा घेणार आहेत.’ सर्वसाधारण सभेनंतर विरोधकांच्या बातम्या अधिक ठळकपणे येत असल्याचे निरीक्षणही मोहोळ यांनी नोंदविले.
सभेतील उपस्थिती किती?
सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना पक्षाकडून संधी मिळत नसल्याच्या तक्रारींचाही मोहोळ यांनी समाचार घेतला. मोहोळ म्हणाले, ‘सर्वसाधारण सभेत बोलताना प्रभागातील विषयांवरच बोलले जाते. शहर पातळीवरील प्रश्न किती मांडले जातात, याचाही विचार केला पाहिजे. तुम्ही शहराचे प्रतिनिधी आहात. सर्वसाधारण सभेत बोलू देत नाही म्हणता, पण अनेकदा विषय मान्य करताना सत्ताधारी असतानाही पुरेसे संख्याबळ सभागृहात उपस्थित नसते, त्याकडेही सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.’
विरोधकांचे मुद्दे खोडण्यासाठी चमू
‘भाजपच्या विरोधातील सर्व शक्ती एकत्र येत आहेत, हे लक्षात येत आहे का? त्यामुळे एकमेकांतील हेवेदावे बाजूला ठेवून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मांडलेले मुद्दे खोडून काढण्यासाठी चमू तयार करा,’ असा सल्ला मोहोळ यांनी दिला. ‘भाजपने २०१४ नंतर समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. मात्र, आता याच माध्यमात पक्ष कमी पडत आहे. याचेही आत्मपरीक्षण नगरसेवकांनी करावे,’ असेही त्यांनी सांगितले.
