भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून जतनेचा भ्रमनिरास झाला असून दिल्लीचा निकाल बोलका आहे. केवळ घोषणा करणारे राज्यातील फडणवीस सरकार कृतिशून्य आहे. दुष्काळ आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून राज्याला पूर्ण वेळ कृषीमंत्री आणि गृहमंत्री नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील बोलत होते. संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे आणि आमदार दीप्ती चवधरी या वेळी उपस्थित होत्या.
केंद्र आणि राज्य सरकारचे सर्वच पातळ्यांवरचे अपयश जनतेपुढे समर्थपणे येऊ शकले नाही, याकडे लक्ष वेधून विखे-पाटील म्हणाले,‘‘राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून गेल्या पाच महिन्यांत ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील पाणी दुसरीकडे पळविण्याचे उद्योग सुरू आहेत. विरोधी पक्षनेता असताना दुष्काळाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा करून नंतर मंत्रिमंडळात जाणाऱ्या शिवसेना नेत्याला शेतकऱ्यांच्या पॅकेजशी कोणतेच देणे-घेणे नाही. पुणो गुन्हेगारीची राजधानी (क्राईम कॅपिटल) होत असताना सरकार काही करत नाही. राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री आणि गृहमंत्री नाही. आठ आमदार निवडून दिले असताना सरकार पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न सोडवू शकले नाही. पायाभूत सुविधा कोलमडल्या आहेत. इंधनाचे दर कमी होऊनही एसटीची भाडेवाढ केली गेली आहे. एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी भाववाढ चुकीची आहे. सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही आणि मुस्लीम आरक्षणाबाबत शब्दही काढत नाही. सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होऊ शकलेली नाहीत.
सरकार अपयशी होत असताना विरोधी पक्ष काय करतो आहे, असे विचारले असता आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद मिळून केवळ ३५ दिवसच झाले असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. पक्षाची पुनर्रचना करण्यासंदर्भात नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे, याकडे लक्ष वेधले असताना आपणही राणेसाहेबांचे मार्गदर्शन घेऊ, असे त्यांनी सांगितले.
प्रियांकांनी नेतृत्व करावे का, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय
प्रियांका गांधी यांनी सक्रिय व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, त्यांनी नेतृत्व करावे की नाही याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी ठरवतील असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला असून आता प्रियांका यांनी सक्रिय व्हावे ही मागणी त्यातूनच होत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या पराभवामुळे विरोधी पक्षाची पोकळी राष्ट्रवादीने भरून काढावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात विचारले असता काँग्रेस हा देशव्यापी पक्ष असल्याने राष्ट्रवादीची पीछेहाट भरून काढण्यासाठी काँग्रेसलाच मदत करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असती तर चित्र वेगळे दिसले असते. अर्थात हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्याला पूर्ण वेळ कृषीमंत्री आणि गृहमंत्री नाही! – राधाकृष्ण विखे-पाटील
भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून जतनेचा भ्रमनिरास झाला असून दिल्लीचा निकाल बोलका आहे. केवळ घोषणा करणारे राज्यातील फडणवीस सरकार कृतिशून्य आहे.
First published on: 13-02-2015 at 03:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp radhakrishna vikhe patil home minister agri minister