पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विरोधकांना तसे पत्र दिले आहे. भाजपच्या या आवाहनाला विरोधक प्रतिसाद देणार की, विनंती फेटाळत भाजपला आव्हान देणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. एका बाजूने पोटनिवडणुकीसाठीची तयारी सुरू करणा-या भाजपचे दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राजकीय पक्षांना पत्र दिले आहे.

हेही वाचा… “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले”, सदाभाऊ खोत यांची टीका

भारतीय स्वातंत्र्याचे अग्रेसर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा राजकीय वारसा दिवंगत आमदार मुक्ता टिळक समर्थपणे पुढे चालवत होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लढवय्या, निर्भिड नेते अशी लोकमान्य टिळकांची ओळख होती. मुक्ता टिळक सर्व समाज घटकांना बरोबर घेत गेली वीस वर्षे पुणे शहरात विकासाचे कार्य केले. त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते. अजातशत्रू व्यक्तिमत्व अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.

हेही वाचा… “आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार,” स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया, मात्र घातली ‘ही’ अट

महाराष्ट्राची अशी वैशिष्ट्यपूर्ण राजकीय संस्कृती आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपला पक्षानिवेश बाजूला ठेवून परस्परांशी उत्तम संबंध प्रस्थापित करतात. विकासकामात कधीच राजकारण येऊ देत नाहीत. तसेच निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सर्वानुमते बिनविरोध निवडणूक केली जाते. राज्याची ही वैभवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. याच भूमिकेतून नुकतेच अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला नाही. राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने विरोधकांच्या विनंतीला मान देत उमेदवार न देता बिनविरोध निवडणूक केली होती. त्याच प्रकारे शहरातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी. मुक्ता टिळक यांना तीच खरी आदरांजली ठरेल, असे या पत्रात मुळीक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू, अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून

भाजपच्या या आवाहनला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रतिसाद देणार का येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असल्याचे संकेत महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांकडून देण्यात आले आहेत. राज्यातील पंढरपूर, कोल्हापूर येथील पोटनिवडणूक भाजपने बिनविरोध केली नसल्याचे दाखले महाविकास आघाडीने दिले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp requested opposition parties to make kasba peth assembly byelection unopposed pune print news apk 13 asj
First published on: 31-01-2023 at 13:41 IST