पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ७६ उमेदवारांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली. भाजपच्या ३७ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. भाजपच्या चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाेन उमेदवारांना पाचशे मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. १२८ पैकी भाजपचे सर्वाधिक ८४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष असे नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) ७६, भाजपच्या ३७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पाच, अपक्ष तीन, मनसे दोन आणि कँाग्रेसच्या एका उमेदवाराला दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली.
भाजपचा दहा पॅनलमध्ये चौकार
महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपचे प्रभाग क्रमांक दोन माेशी- बोऱ्हाडेवाडी, प्रभाग तीनचऱ्होली-डुडुळगाव, प्रभाग चार दिघी-बाेपखेल, सहा धावडेवस्ती-सद्गुरूनगर, १० संभाजीनगर, ११ कृष्णानगर-घरकुल, १५ निगडी-प्राधिकरण, २५ पुनावळे-ताथवडे, २६ पिंपळे निलख-कस्पटेवस्ती आणि प्रभाग २९ पिंपळे गुरव-जवळकरनगर येथे संपूर्ण पॅनल विजयी झाले. यामध्ये सर्वाधिक भाेसरी विधानसभेतील पाच, चिंचवडमधील तीन आणि पिंपरीतील दोन पॅनल आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रभाग क्रमांक नऊ नेहरूनगर-खराळवाडी, २० संत तुकारामनगर-कासारवाडी आणि प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगाव-जिजामाता अशा तीन प्रभागांत संपूर्ण पॅनल विजयी झाले असून, तिन्ही पॅनल पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत.
महापालिका सभागृहात ६४ महिला, ६४ पुरुष
महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने ६४ महिला सभागृहात येणारच हाेत्या. तथापि प्रभाग क्रमांक आठ (इंद्रायणीनगर-बालाजीनगर), २० (संत तुकारामनगर-कासारवाडी) आणि ३०मध्ये (दापाेडी-फुगेवाडी) तीन जागांवर पुरुष उमेदवारासमाेर महिला उमेदवार रिंगणात हाेत्या. त्यांचा पराभव झाल्यामुळे सभागृहात आता ६४ महिला आणि ६४ पुरुष नगरसेवक असतील.
ढोरे, कांबळे, कुदळे, तरस ‘जायंट किलर’
प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगरमध्ये भाजपच्या डॉ. सुहास कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून लढलेल्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचा २५६ मतांनी पराभव केला. याच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तुषार सहाने यांनी भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना ७९० मतांनी पराभूत केले. प्रभाग १६ रावेत- किवळेमधून शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख नीलेश तरस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा चार हजार ७२४ मतांनी पराभव केला.
प्रभाग २० संत तुकारामनगर-कासारवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जितेंद्र ननावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा धर यांना पराभूत केले. याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वर्षा जगताप यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्षा, माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांचा दोन हजार १७३ मतांनी पराभव केला. प्रभाग २१ पिंपरीगावातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रियंका कुदळे यांनी भाजपकडून लढलेल्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांना तीन हजार ४६५ मतांनी पराभूत केले. ३२ सांगवी गावठाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उज्ज्वला ढाेरे यांनी भाजपच्या माजी महापाैर उषा ढाेरे यांचा दोन हजार ७०१ मतांनी पराभव केला.
भाजपचे काळजे सर्वाधिक मतांनी विजयी
भाजपचे माजी महापौर नितीन काळजे यांना ३० हजार ९९२ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रकाश आल्हाट यांचा १९ हजार ६५३ मतांनी पराभव केला. काळजे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. भाजपच्या जयश्री गावडे यांचा अवघ्या २१ मतांनी पराभव झाला. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सविता आसवानी निवडून आल्या आहेत.
