पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या सीमा सावळे बिनविरोध

अध्यक्षपदाची निवडणूक ३१ मार्चला होणार असून, सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

pmc standing chief
पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप नगरसेविका सीमा सावळे यांनी सोमवारी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महापौर नितीन काळजे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी महापौर आझम पानसरे, गटनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षवर्तुळात अनेकांचा तीव्र विरोध असतानाही शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आग्रही राहिल्याने सावळे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. महापौर, उपमहापौर निवडणुकीतून माघार घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या वेळी मात्र उमेदवारी अर्जच दाखल केला नाही, त्यामुळे सावळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक ३१ मार्चला होणार असून, सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. भाजपने सावळे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केल्यानंतर महापौर नितीन काळजे, शहराध्यक्ष जगताप यांच्या उपस्थितीत सावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.  स्थायी समितीत १६ पैकी १० भाजपचे तर चार सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. भाजपचा विजय निश्चित असल्याने राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही. त्यामुळे सावळे यांचा विजय निश्चित असून शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर पहिला महापौर होण्याचा मान आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे यांना मिळाला. गटनेतेपदी पक्षातील जुने कार्यकर्ते व गडकरी समर्थक एकनाथ पवार यांची वर्णी लागली. स्थायी समिती अध्यक्षपदी लक्ष्मण जगताप समर्थकाची वर्णी लागणार होती. त्यानुसार सावळे यांना उमेदवारी मिळाली. स्थायी समितीत सावळे यांच्या नावाला कोणतीही स्पर्धा होणार नाही, अशी पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. तिसऱ्यांदा निवडून आलेल्या सावळे या जगताप समर्थक आहेत. यापूर्वी त्या शिवसेनेत होत्या. तेव्हा तत्कालीन खासदार गजानन बाबर यांच्या त्या समर्थक होत्या.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून त्या भाजप परिवारात दाखल झाल्या. भोसरीतील इंद्रायणीनगर प्रभागातून यंदा त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या व पहिल्याच वर्षी त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. महापौर, गटनेते यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदही भोसरी मतदारसंघाकडे गेले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp seema savale elected unopposed pcmc standing committee chairman