मुंबईच्या निवडणुकीवर सरकारचे भवितव्य अवलंबून – अजित पवार

मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे, त्यावरच भाजप-शिवसेनेचा डोळा आहे. मुंबई पालिकेची ‘तिजोरी’ आपल्याकडे असावी, यासाठी या दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे भांडण लागले आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री शिवसेनेची ‘औकात’ काढतात. तर, शिवसेनेकडून फडणविसांना ‘गुंडांचे मुख्यमंत्री’ म्हणून हिणवले जाते. कौरव-पांडवांची उपमा देत एकमेकांवर बेछूट आरोप करणाऱ्या या दोन्ही पक्षांकडून साचलेल्या गोष्टींचा उद्रेक होत असल्याने मुंबईच्या निवडणुकांवरच सध्याच्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, असे भाकीतही पवारांनी केले.

पिंपरी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ पवारांच्या हस्ते झाला, तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई आपल्याकडे राखण्यासाठीच शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली आहे. उत्तरादाखल भाजपही आक्रमक पद्धतीने उतरला आहे. शिवसेनेच्या हातातून मुंबई महापालिका गेल्यास त्यांची ताकद कमी होईल, असे भाजप नेत्यांचे गणित आहे. त्यावरून दोन्ही पक्षांत टोकाचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री प्रचारात अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सगळ्या प्रकारचे गुंड भाजपमध्ये जात असून त्याचे भाजपनेते थातूरमातूर समर्थन करत आहेत. सरकारमध्ये शिवसेनेचे १२ मंत्री असूनही त्यांचा भाजपशी दुरावा आहे. ते राजीनामा खिशात घेऊन फिरण्याची भाषा करतात, मात्र त्यांचे राजीनामे राज्यपालांकडे दिले जात नाहीत. ‘सामना’ मधून सरकारला झोडपण्याचे काम नित्यनेमाने सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

गृहखाते सांभाळण्यात मुख्यमंत्री अपयशी

मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. मात्र, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. िहजवडीत उच्चशिक्षित तरुणीचा हकनाक बळी गेला, हे सरकारचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला खुनांचे सत्र सुरू आहे, तेथे कायदा सुव्यवस्था नावालाही नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांची धूळफेक आहे. शेतक ऱ्यांना काहीच नाही. पुढील वर्षांच्या उत्पन्नाचा अंदाज नाही. महाराष्ट्राचे रेल्वेमंत्री असतानाही राज्याला भरीव निधी ते देऊ शकले नाहीत. शिवसेना-मनसे कधीतरी मराठीचा मुद्दा घेतात. मनसे सध्या पिछाडीवर आहे. राज ठाकरेंना कोणी टाळी द्यायला तयार नाही, म्हणून आता ‘राजाला साथ द्या’ अशी साद ते घालत आहेत, अशी खिल्ली त्यांनी उडवली.