पिंपरी पालिकेच्या २०१७ च्या निवडणुका जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवा, त्यासाठी सर्वानी एकत्रित काम करा, गटातटाचे राजकारण करू नका, असे कार्यकर्त्यांचे ‘बौद्धिक’ भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी पिंपरीत घेतले. काम करणाऱ्यांनाच पदे मिळतील, कोणाचीही वशिलेबाजी चालणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.
श्याम जाजू यांच्या उपस्थितीत भाजपच्या पिंपरी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी त्यांचे स्वागत केले. सरचिटणीस मोहन कदम, राजू दुर्गे, अशोक सोनवणे, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, बाबू नायर, अजय पाताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जाजू म्हणाले, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी शहरात भाजपची ताकद वाढते आहे. पक्षाचा एक खासदार व एक आमदार शहरात आहे. पुढील काळात नगरसेवकांची संख्या निश्चितपणे वाढेल. सदस्यनोंदणी चांगल्या प्रकारे झाली आहे. महासंपर्क अभियानातही अशीच कामगिरी व्हायला हवी. केंद्रात व राज्यात सरकारने केलेली कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. पालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा, त्यात गटबाजी नको. प्रास्ताविक सदाशिव खाडे यांनी केले. सूत्रसंचालन राजू दुर्गे यांनी केले.
महिला पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी
कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. मात्र, बैठक संपताच दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. बैठकीचे निमंत्रण मिळत नाही, या मुद्दय़ावरून सुरू झालेले भांडण सुरुवातीला स्थानिक नेत्यांनी मिटवले. मात्र, रस्त्यावर गेल्यानंतर पुन्हा त्यांच्यात कलगीतुरा रंगला.