पुणे : ‘राज्यघटनेत इंदिरा गांधींनी ‘समाजवाद’ हा शब्द घातला. मात्र, काँग्रेसच्या काळात गरिबी कमी होण्याऐवजी द्रारिद्र्यरेषेखालील लोकांच्या संख्येत वाढच झाली,’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी केली. खऱ्या अर्थाने ‘नाही रे’ वर्गाचे कल्याण करण्यासाठी भाजपच्या काळातच प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘विवेकानंद केंद्र’ आणि ‘कन्याकुमारी मराठी प्रकाशना’च्या वतीने भंडारी यांच्या हस्ते पी. परमेश्वरन लिखित आणि चं. प. तथा बापूसाहेब भिशीकर अनुवादित ‘मार्क्स आणि विवेकानंद : एक तौलनिक अध्ययन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ‘चाणक्य मंडल’चे संचालक अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ लेखक अभिजित जोग, आनंद हर्डीकर, सुधीर जोगळेकर, केंद्राच्या पुणे शाखेचे संचालक माधव जोशी या वेळी उपस्थित होते.
भांडारी म्हणाले, ‘दमनाच्या आणि शोषणाच्या विरोधात मांडणी करण्याचा प्रयत्न मार्क्सवाद आणि त्यातून पुढे आलेल्या समाजवाद, साम्यवादात केला जातो. मात्र, समाजवादी, साम्यवादी समाजाची रचना करण्याची भाषा करणारे पक्ष जेव्हा सत्तेत होते, तेव्हा शोषण आणि गरिबीही तशीच होती. समाजवाद हा शब्द संविधानात घालणाऱ्या काँग्रेसच्याही काळात गरिबी कमी झाली नाही; याउलट दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या संख्येत वाढच झाली. आता भाजपमुळे गरिबी कमी होत आहे, गरिबातल्या गरीब माणसाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.’
‘लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा दावा करणारा मार्क्सवाद आणि मूळचा समाजवादी विचार, लोकशाहीचा स्वीकार केवळ सत्ता मिळेपर्यंतच करतो. सर्वहारा वर्गाची हुकूमशाही स्थापन करणे, हाच त्याचा मूळ उद्देश आहे. त्याने प्रचंड मोठा रक्तपात आणि निरपराध्यांची हत्या हेच साध्य होते. भांडवलशाहीचा सहज स्वभाव जग जिंकण्याचा आहे. त्याला विरोध करण्याचा दावा करून मार्क्सवाद उभा राहतो. मात्र, तो भांडवलशाहीपेक्षाही हिंसक आणि अन्यायकारक आहे,’ असे धर्माधिकारी यांनी सांगितले.