पुणे : ‘आपली संस्कृती एकाच सत्याच्या अनेक प्रकारे होणाऱ्या अविष्कारला मानते. तिथे एकाच प्रकारच्या विचाराची सक्ती नाही. सगळ्यांनीच ‘आपल्या’सारखे बोलायला हवे, हा हट्ट चूकीचा आहे,’ अशी परखड प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
‘विवेकानंद केंद्र’ आणि ‘कन्याकुमारी मराठी प्रकाशना’च्या वतीने भांडारी यांच्या हस्ते ‘मार्क्स आणि विवेकानंद : एक तौलनिक अध्ययन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्या वेळी ‘चाणक्य मंडल’चे संचालक अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ लेखक अभिजीत जोग, आनंद हर्डीकर, सुधीर जोगळेकर, केंद्राच्या पुणे शाखेचे संचालक माधव जोशी उपस्थित होते. पी. परमेश्वरन लिखित मूळ पुस्तकाचा चं. प. तथा बापूसाहेब भिशीकर यांनी हा अनुवाद केला आहे.
भाजपच्या राज्यात हुकूमशाही असल्याची टिका विरोधकांकडून केली जाते, विरोधकांना संपवण्याचे आरोप वारंवार केले जातात. आता प्राचीन भारतीय संस्कृतीचा दाखला देत भांडारी यांनीही सगळ्यांनी एकाच पद्धतीने विचार करण्याचा हट्ट धरणे, चुकीचे असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले,‘प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा एक विचार असतो. त्याचा आदर करायला हवा. सगळ्यांनीच ‘आपल्या’सारखे बोलायला हवे, हा हट्ट चूकीचा असून, मार्क्सवादी आणि ‘आपल्या’त फरक राहणार नाही.’