पुणे : ‘लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा दावा करणारा मार्क्सवाद आणि मूळचा समाजवादी विचार लोकशाहीचा स्वीकार केवळ सत्ता मिळेपर्यंतच करतो. सर्वहारा वर्गाची हुकुमशाही स्थापन करणे, हाच त्याचा मूळ उद्देश आहे. त्याने प्रचंड मोठा रक्तपात आणि निरपराध्यांची हत्या हेच साध्य होते. भांडवलशाहीचा सहज स्वभाव जग जिंकण्याचा आहे. त्याला विरोध करण्याचा दावा करून मार्क्सवाद उभा राहतो. मात्र, तो भांडवलशाहीपेक्षाही हिंसक आणि अन्यायकारक आहे,’ असे मत अविनाश धर्माधिकारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात ‘विवेकानंद केंद्र’ आणि ‘कन्याकुमारी मराठी प्रकाशना’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, ज्येष्ठ लेखक अभिजीत जोग, आनंद हर्डीकर, सुधीर जोगळेकर, केंद्राच्या पुणे शाखेचे संचालक माधव जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
‘मार्क्सवादी संपले नाहीत’
‘मार्क्सवादाच्या नावाखाली आज जे जगात चालले आहे, तो विचार मार्क्सवादाच्या चौकटीत बसत नाही. शोषण, दमन तसेच आहे. निवडणूकीच्या राजकारणात २०१४ पासून समाजवादी, साम्यवादी पक्षांचा पराभव झाला असला तरी, वैचारिक लढ्यात ते अजूनही पराभूत झालेले नाही. त्या विचारांचा, समजुतींचा पराभव झालेला नाही. याउलट २०१४ पूर्वोक्षाही डाव्या विचारांच्या लोकांची संख्या वाढलेलीच दिसते,’ असे भांडारी यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘निवडणुकीतली आकडेवारी सोडली तर त्यांचा पराभव झालेला नाही. निवडणुकीतली आकडेवारी किती खोटी असते, हे ‘आमच्या’इतके कुणाला कळणार नाही. हे संपले म्हणून आम्हाला जाहीर करण्यात आहे. तसेच आता मार्क्सवाद्यांबाबत होते आहे. निवडणुकीत त्यांना यश मिळेल की, नाही हे सांगता येत नाही. मात्र, त्यांची संख्या वाढली आहे.’
‘मुद्द्यांबरोबरच गुद्द्यांसाठीही तयार रहा’ ‘मार्क्सवाद्यांच्या वैचारिक मांडणीच्या विकृतीला मर्यादा नाही. अद्यापही मार्क्सवादाचा प्रभाव ओसरला नाही. तो अजिबात संपलेला नाही. तो नवी रूपे घेऊन येतो आहे. माध्यमे, मनोरंजन आणि शिक्षण क्षेत्रात मार्क्सवादाची मूळे धरून आहेत. त्यामुळे मार्क्सवादा इतक्याच तोडीसतोड विचारांची मांडणी करता यायला हवी. उद्या मुद्द्यावरून गुद्द्यावर हा वाद आला, तर त्यालाही तयार राहायला हवे,’ असे आवाहन अविनाश धर्माधिकारी यांनी केले.