अविनाश कवठेकर पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून हटविण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे शुक्रवारी दिला. कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेच पाहिजे आणि त्या संदर्भातील छायाचित्रे समाजमाध्यमांत दिसली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. भोर विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अवघे १५ पदाधिकारी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भोर, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. भोर विधानसभा मतदारसंघासाठी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमासाठी शेवटची मुदत दिली जाईल, असे बावनकुळे म्हणाले. आणखी वाचा-‘ससून’च्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेर्यात दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी काही सूचना केल्या. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास संयोजक संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, शहराध्यक्ष धीरज घाटे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांच्यासह माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते. कार्यकर्ता संघटनेचा प्राण असतो. भाजप कार्यकर्त्यांनीच मोठा केलेला पक्ष आहे. राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता सर्वोच्च पदावर केवळ भाजपमध्ये जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे उदाहरण आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील भारत घडवायचा असेल, तर महाविजय २०२४ अभियान यशस्वी करावे लागेल. त्यासाठीची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.