कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या शैलेश आणि कुणाल टिळक यांची नाराजी दूर झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून टिळक यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केल्यानंतर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन टिळक कुटुंबीयांची ‘समजूत’ काढल्यानंतर प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय शैलेश यांनी घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, कोपरा सभांचे नेतृत्व करणार असल्याचे कुणाल टिळक यांनी सांगितले, तर कमी वेळात काम करून रासने यांना विजयी करण्याचा निर्धार शैलेश यांनी व्यक्त केला.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी मुक्ता यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल यांनी दावा केला होता. या दोघांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र त्यांच्याऐवजी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे टिळक कुटुंबीयांना तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसेच रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही ते उपस्थित राहिले नव्हते. यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश यांची भेट घेतली. त्यानंतर पक्षाच्या निवडणूक तयारीच्या बैठकीला शैलेश आणि कुणाल टिळक उपस्थित राहिले. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा– इंदापूरमधील ब्रिटिशकालीन डिकसळ पूल बंद; भिगवण बाजारावर परिणाम
कमी वेळात काम करायचे आहे. उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा आहे. पक्ष विचार करत असतो. काही कौटुंबिक कारणांमुळे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित रहात आले नाही. मात्र आता प्रचारात सहभागी होणार आहे. कमी कालावधीत जास्त काम करून मोठा विजय मिळवू, असे शैलेश यांनी बैठकीत सांगितले.
कुणाल म्हणाले,की कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी निनावी फलक लावण्यात आले. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:चा विचार करतो. रासने यांच्या प्रचार सभेत कोपरा सभांचे नेतृत्व करणार आहे.