पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या तसेच भाजप उमेदवारांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ६९ जणांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांचे सहा वर्षे निलंबन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त होती. पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक जण इच्छुक होते. सुमारे अडीच हजार इच्छुकांनी पक्षाचे अर्ज भरले होते. इतर पक्षांकडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या आणि मर्यादित जागा यामुळे अनेकांना तिकिट मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविली तर काहींनी भाजप उमेदवाराच्या विरोधात असलेल्या उमेदवाराचा प्रचार केला.

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल भाजपने घेतली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ६९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आली असून पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक लढविण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या ६९ जणांची यादी जाहीर केली आहे.

निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये हडपसर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. या मतदारसंघातून १९ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ खडकवासला विधानसभा मतदारसंघातून ९ जणांना, वडगाव शेरी मतदार संघातून ८ , शिवाजीनगर मतदारसंघातून ७ जणांचा समावेश आहे.

कोथरूड विधानसभा आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी सहा तर पर्वती मधून ४ जणांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपने ज्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यापैकी अनेक जणांनी यापूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाकडून हकालपट्टी होण्याआधीच अनेकांनी भाजपला रामराम केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार भाजपच्या विरोधात तसेच पक्षाकडून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षाकरिता पार्टीमधून निलंबन करण्यात आले आहे. पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केल्या आहेत.

या कारवाईबाबत अधिक माहिती देताना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पक्षशिस्त न पाळणाऱ्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती न दाखविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.