पिंपरी : भिक्षेकरीमुक्त शहर करण्याचा ठेका मिळावा, यासाठी अटी-शर्ती बदलण्याकरिता महापालिका उपायुक्तांना बघून घेण्याची धमकी देणाऱ्या भाजप उपाध्यक्षाने अखेर माफी मागितली आहे. उपाध्यक्षाने महापाैरांच्या दालनामध्ये संबंधित महिला उपायुक्तांची माफी मागून या विषयावर पडदा टाकला.

उपायुक्त शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यालयात कामकाज करीत असताना तेथे भाजपचे उपाध्यक्ष अचानक आले. माझ्या संस्थेला काम द्यावे, असे ते मोठ्या आवाजात म्हणाले. उपायुक्तांनी शासकीय निविदा प्रक्रियेबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित पदाधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. माझ्यासाठी अटी-शर्ती, नियम बदला. मला काही माहिती नाही, असे मोठ्याने बोलले. मी जे सांगतो, ते तुम्ही ऐकले नाही, तर मी तुम्हाला बघून घेईन, अशी सर्वांसमोर धमकी दिली. मोठ्या आवाजात शिवीगाळ केली, असे उपायुक्त यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, संबंधित उपाध्यक्षाने सर्व आरोप फेटाळले. ‘मी कोणतीही धमकी दिली नाही,’ असा दावाही त्यांनी केला होता.

या प्रकरणाची प्रशासकीय आणि भाजपच्या वर्तुळात जोरदार चर्चा झाली. हे प्रकरण मिटवण्यासाठी महापौर रवी लांडगे यांनी पुढाकार घेतला. भाजप उपाध्यक्ष आणि संबंधित महिला उपायुक्तांना दालनात बोलावून घेतले. तिथे उपाध्यक्षाने उपायुक्तांची माफी मागून या विषयावर पडदा टाकला.

ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना धमकी की कसली मस्ती?

महापालिकेतील एका विभागाअंतर्गत कामाचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदाराने महिला उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये घुसून धमकी दिल्याचा प्रकार गंभीर असून ही कसली मस्ती आहे? असा संताप विराेधी पक्षनेते भाऊसाहेब भाेईर यांनी व्यक्त केला. तसेच संबंधित ठेकेदाराच्या पाठिशी काेण आहे, याचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली.

भाेईर म्हणाले, ठेकेदाराकडून अधिका-यांना धमकीचा प्रकार चुकीचा आहे. धमकी देण्यापर्यंत मजल जाते, ही कसली मस्ती आहे. संबंधित ठेकेदाराच्या पाठिशी काेण आहे, याचा देखील तपास हाेणे गरजेचे आहे. प्रशासकीय राजवटीत माेठ-माेठे प्रकल्प हाती घेण्यात आले. या सर्व माेठ्या प्रकल्पाचा खर्च वाढत असल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मागील काही दिवसात कमी दराच्या निविदा येऊनही त्या रद्द केल्या आहेत. शहरात विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी असताना त्यांच्याकडून माेफत सल्ला मिळू शकताे. मात्र, सल्लागारांवर काेट्यवधी रूपये खर्च केले जात आहे, ही बाब योग्य नाही.

अधिकाऱ्यांना मालक झाल्यासारखे वाटू लागले

भाेईर पुढे म्हणाले, प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांना आपण मालक झाल्यासारखे वाटू लागले आहे. मात्र, त्यांनी जनतेचे सेवक असल्याचे लक्षात ठेवावे. पालिकेची गाडी रूळावर आणण्यासाठी आर्थिक नियोजन करणे काळाची गरज आहे. अन्यथा महापालिकेला शासनाकडून पैसे घेऊन कर्मचा-यांचे वेतन करण्याची वेळ येईल. माेठ्या प्रकल्पासाठी खासदार, आमदारांनी शासनाकडून निधी आणला पाहिजे. शहरातील अनेक भागात आजही टॅकरने पाणी पुरवठा करावा लागताे. नागरिकांना दरराेज पाणी पुरवठा हाेण्यासाठी महापाैर रवी लांडगे प्रयत्न करणार असतील तर त्याला आमचे समर्थनच असणार आहे.