scorecardresearch

“महिला मंत्र्यांच्या पक्ष कार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकण्याची संस्कृती शरद पवारांनीच…”; चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना रिप्लाय

रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली होती, त्यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय

chandrakant patil on Rohit Pawar
रोहित पवारांच्या ट्विटवर चंद्रकांत पाटलांचा रिप्लाय (फाइल फोटो)

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलल्याच्या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याप्रकऱणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आवाहन करत भाजपावर निशाणा साधला. याच टीकेला चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुनच उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसला टोला लगावलाय.

नेमकं घडलं काय?
स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?
या मुद्द्यावरून आमदार रोहीत पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे”, असं ट्वीट रोहीत पवारांनी केलं आहे.

“भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी”, असं देखील रोहीत पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टॅग करत रोहीत पवारांनी त्यांना देखील लक्ष्य केलं आहे. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे”, असं रोहीत पवार यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

चंद्रकांत पाटीलांनी काय उत्तर दिलं?
चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवरांच्या तीन ट्विटपैकी शेवटच्या म्हणजेच त्यांना टॅग करण्यात आलेल्या ट्विटला कोट करुन त्यावर रिप्लाय दिलाय. “रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवारांनीच ही संस्कृती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केलाय. या ट्विटमध्ये ‘हात’ शब्द कोट करुन पाटील यांनी अप्रत्यक्षपणे हात ही निवडणूकीची निशाणी असणाऱ्या काँग्रेसला चिमटा काढलाय.

दरम्यान, या मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीकडून सोमवारी डेक्कन पोलीस स्थानकामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भस्मराज तीकोने ( रा.कसबा पेठ ) , प्रमोद कोंढरे( रा. नातू बाग), मयूर गांधी (शुक्रवार पेठ,) या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp vs ncp at smriti irani program in pune chandrakant patil reply rohit pawar criticism scsg