शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.
राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आज टिळक चौकात (अलका टॉकिज) जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरिएटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते. या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी भाजपची मागणी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिका-यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसूल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील,असा इशारा मुळीक यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp warning end ncp bullying in the city print news amy
First published on: 18-05-2022 at 15:47 IST