केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी सोमवारी (१६ मे) पुणे दौर्‍यावर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महागाईविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बालगंधर्व येथे स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्या महिला आंदोलक वैशाली नागवडे यांच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आरोपीला भाजपा कार्यकर्त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

वैशाली नागवडे म्हणाल्या, “स्मृती इराणी या आज पुण्यात येणार आहेत याबाबतची आम्हाला माहिती मिळाली. त्यावर आम्ही आज दुपारी सेनापती बापट रोडवर एका हॉटेलमध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम होता. तिथे जाऊन वाढत्या महागाईबाबत त्यांना निवेदन देणार होते, पण तिथे प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर आम्ही बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी निषेध नोंदविण्यास आलो.”

“भाजपाची महिलाबद्दल काय मानसिकता आहे हे उघड”

“यावेळी आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणावरून पोलीस बाहेर घेऊन जात असताना एका भाजपाच्या कार्यकर्त्याने माझ्या कानशिलात मारली. यातून भाजपाची महिलाबद्दल काय मानसिकता आहे हे समजून येत असून या प्रकरणी संबधित व्यक्तीला तातडीने अटक करून कारवाई करावी,” अशी मागणी वैशाली नागवडे यांनी केली. आरोपी भाजपा कार्यकर्त्याचं नाव भस्समराज तिकोणे असं आहे.

स्मृती इराणींच्या गाडी ताफ्यावर महिला कार्यकर्त्यांकडून अंडी, बांगड्या फेकण्याचा प्रयत्न

या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळताच सर्वांनी डेक्कन पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. तसेच मारहाण करणार्‍या व्यक्तीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत रस्त्यावर आंदोलन केले.

हेही वाचा : पुण्यात महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, स्मृती इराणींच्या गाडी ताफ्यावर अंडी, बांगड्या फेकण्याचा प्रयत्न

ही घटना थांबत नाही तोवर बालगंधर्व रंगमंदिर येथील स्मृती इराणी यांचा कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विशाखा गायकवाड यांनी अंडे फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी विशाखा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलाला ताब्यात घेतले असून चौकशीसाठी सुरू आहे.