पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांना ‘मोदी भक्त’, ‘नमो भक्त’ अशी शेलकी विशेषणे लावली जात असताना पुण्यातील एका ‘नमो भक्ता’ने मोदी यांच्यावरील अतिरेकी भक्तीतून मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी के ली आहे. औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. हे मंदिर आणि अतिरेकी भक्ती विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे.

राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला आहे. या मदिराच्या उभारणीशी शहर भाजपचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी के ली आहे. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च के ला असून पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला आहे.

स्वातंत्र्य दिनापासून मंदिर सर्वासाठी खुले करण्यात आले असून मयूर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावण्यात आली आहे. तसेच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या संदर्भात मयूर मुंडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रथम प्रतिसाद देऊन प्रतिक्रिेसाठी परत संपर्क साधण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मुंडे हे भाजपचे कार्यकर्ते असून यादी प्रमुख असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकाराची माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

औंध-बाणेर-बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त नितीन उदास म्हणाले की, या संदर्भात माहिती घेण्यात येईल. याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही.

देशातील नागरिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दैवतीकरण के व्हाच करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांचे मंदिर उभे राहिले यात आश्चर्य वाटत नाही. अशा प्रकारे दैवतीकरण झाले की त्या व्यक्तीकडून काही चुका होणे शक्यच नाही, अशी नागरिकांची ठाम समजूत होते. किं वा चुका झाल्या तरी त्या चुकांचेही समर्थनच के ले जाते. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सध्या असे प्रकार वाढत आहेत आणि त्यावरून माजवली जाणारी दुफळीही दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे, ही चिंतेची बाब आहे.

– विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

कोणाचे मंदिर उभारायचे हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक भावनांचा प्रश्न आहे. हा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

डॉ. प्रवीण दबडघाव, कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत

वैयक्तिक रीत्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. याचा पक्षाचा कोणताही संबंध नाही. मोदींचे कार्य चांगले वाटल्याने कार्यकर्त्यांने मंदिर उभारले आहे.

– जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

पक्षाच्या विचारसरणीमध्ये असे प्रकार बसत नाहीत, हे नक्की. पण मोदींवरील प्रेमापोटी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. यातील वैयक्तिक भावना लक्षात घ्यावी लागेल.     – सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर