दृष्टिहीन जोडप्याच्या विवाहाचा शाहीथाट कौतुकास्पद!

शाही सोहळ्यांच्या गर्दीत दृष्टीहीन जोडीच्या विवाह सोहळ्याचा थाट निराळा होता.

विवाह,alandi,pune,Blind couples wedding
विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राज्यात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. विवाह सोहळ्यात भरमसाठ पैशाची उधळपट्टी केल्याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. यात आता देवाची आळंदी येथील एका विवाह सोहळ्याने अनोख्या कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आळंदीतील तुळजाभवानी मंगल कार्यालयात शुक्रवारी दृष्टिहीन योगेश आणि स्वाती यांचा विवाह सोहळा पार पडला. हा अनोखा विवाह सोहळा जागृती सोशल फाउंडेशनने आयोजित केला होता. योगेश हा गोवा राज्यातील म्हापसा या गावचा असून वधू स्वाती ही उस्मानाबाद मधील तरे या गावची आहे. या दोघांचा विवाह हा याच फाउंडेशन जुळवून आणला. मोठं मोठ्या विवाहसोहळ्या पेक्षा अधिक श्रीमंती या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली, अशा प्रतिक्रिया उपस्थितांच्या तोंडून ऐकायला मिळत होत्या.

विवाहासाठी मांडव, शेजारीच मांडलेला भांड्यांचा संसार आणि लग्नासाठी पाहुणे मंडळींनी केलेली गर्दी,  वाजत गाजत घोड्यावरून काढलेली नवरदेवाची वरात हे सर्वच कौतुकास्पद होते. या सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींनी डोळ्यावर पट्टी बांधून योगेश आणि स्वाती यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्याचे पाहायला मिळाले.  एवढेच नाही तर लग्न सोहळ्यात वाद्य वाजविणाऱ्या मंडळींच्या डोळ्यावर देखील काळ्या पट्या बांधल्या होत्या. आठ मंगल-अष्टका झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना पुष्प हार घातले. या  विवाहामुळे आनंदी असल्याचा भावना योगेशने व्यक्त केली. तर वधू स्वाती म्हणाली की, समाजाने आमच्यासारख्या दृष्टीहीन व्यक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. योगेश हा माझा मित्र होता आता तो माझा जोडीदार झाला आहे. त्यामुळे मी खूपच आनंदी आहे.

दृष्टिहीन रेडिओ समालोचक सतीश नवले हे या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. १२ मे २०१४ या वर्षी अशाच पद्धतीने त्यांचाही विवाह संपन्न झाला होता. देशात आणि महाराष्ट्रात लग्नात पैशाची उधळपट्टी करणारे कमी नाहीत. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या मुलाचे मोठ्या थाटात आणि जल्लोषात शाही विवाह पार पडला होता. तसेच संजय काकडे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. या दोन्ही लग्नाला सर्व स्तरातून विरोध झाला होता. त्यानंतर गुरुवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मुलीचा लोणावळ्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही थाटात साखरपुडा झाला. या शाही सोहळ्यांच्या गर्दीत दृष्टीहीन जोडीच्या विवाह सोहळ्याचा थाट निराळा होता, अशी प्रतिक्रिया ही उपस्थितांकडून ऐकायला मिळत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Blind couples wedding appreciated alandi pune