पुणे : मानाच्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत विविध वैयक्तिक पारितोषिकांसह बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (बीएमसीसी) ‘तुम बहते रहना’ हे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले. तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने ‘उबरमेन्श्च’ या सादरीकरणासाठी द्वितीय, तर आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील वास्तुकला महाविद्यालयाने ‘साम्बरी’ या सादरीकरणासाठी तृतीय क्रमांक मिळवला.
सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमीतर्फे आयोजित फिरोदिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार आणि रविवारी झाली. या स्पर्धेचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. अंतिम फेरीत नऊ महाविद्यालयांनी सादरीकरण केले होते. अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे, अभिनेता संदीप पाठक, दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. निकाल जाहीर झाल्यावर आरोळ्या, घोषणा देत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये लेखनासाठी बीएमसीसीच्या हृषिकेश मुळे याने प्रथम क्रमांक पटकावला. तर स. प. महाविद्यालयाच्या जितामित्र कुलकर्णीला द्वितीय, एमआयटीच्या आर्या डिग्रजकर, अर्थव खोत यांनी तृतीय क्रमांक मिळवला. दिग्दर्शनासाठी बीएमसीसीच्या संकेत हडाळने प्रथम, स. प. महाविद्यालयाच्या प्रचिती भावे आणि नील देशपांडे यांनी द्वितीय, डॉ. डी. वाय. पाटील वास्तुकला महाविद्यालयाच्या सचिन डफळे आणि वेदांग गिड्ये यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. अभिनयासाठी पुरुष गटात बीएमसीसीच्या मयंक मोहिरेने प्रथम, बीएमसीसीच्याच संकेत हंडाळने द्वितीय, स. प. महाविद्यालयाच्या नील देशपांडेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. आशुतोष मोरे (आरएससीओई), आर्यन गायकवाड (बीएमसीसी), मुकुल ढेकळे (एमएमएससीएलसी), गोविंद रेगे (जीसीसीओई औरंगाबाद) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. महिला गटात बीएमसीसीच्या साक्षी देशपांडेने प्रथम, आएससीओईच्या योगिनी देशमुखने द्वितीय, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सई कांबळेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मृणाल बर्वे (व्हीआयटी), पल्लवी विशाल (एमसीओई) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सांघिक अभिनयाचे जेएससीओईच्या श्रेयस चौधरी, विशाल झळके, ओंकार येरावार, वैष्णवी खंडागळे यांना देण्यात आले.