महाविद्यालयातील वर्गातला आपला बाक, वर्गात बसलेल्या प्रेयसीला बाहेर बोलावण्यासाठी मारलेली शिट्टी, कट्टय़ावर रंगलेल्या मित्रांच्या गप्पा आणि आई-वडिलांसारखेच प्रेम करणारे प्राध्यापक..महाविद्यालयीन दिवसांच्या सगळ्या आठवणी बीएमसीसीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जागवल्या. निमित्त होते ‘बृहनोत्सवा’चे!
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘बृहनोत्सव’ या माजी विद्यार्थी मेळाव्यात चार माजी विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, विधानसभेचे माजी सभापती अरूण गुजराथी, अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ सहकार नेते विदुरा नवले आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले. उद्योजक संजय साबळे, संगीतकार राहुल रानडे, गायक राहुल देशपांडे, पत्रकार डॉ. बाळकृष्ण दामले, क्रीडापटू निखिल कानिटकर आणि अर्चना देवधर यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर बँकिंग क्षेत्रातील कार्याबद्दल विद्याधर अनास्कर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एन रावळ, माजी प्राचार्य डॉ. सी. जी. वैद्य, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिन नाईक या वेळी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, ‘‘मी बीएमसीसीत शिकत होतो तेव्हा राज्यात फक्त तीन वाणिज्य महाविद्यालये होती. आता प्रत्येक तालुक्यात वाणिज्य महाविद्यालय आहे; परंतु बीएमसीसीचा झेंडा आजही देशात उंच आहे. या महाविद्यालयातील शिक्षणाने दिलेली दृष्टी मला आयुष्यात पुढे नेणारी ठरली.’’
‘शिक्षक आणि वर्गाची संकल्पना शिक्षणातून हद्दपार होत असून विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी शिक्षणात मानवी चेहरा असणे महत्त्वाचे आहे,’ असे गुजराथी यांनी सांगितले.