पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने पुण्यातून लांब पल्ल्याच्या आंतराष्ट्रीय उड्डाणांसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानळाचा विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या विमानतळावरून नागरी उड्डाणांबरोबरच बँकाॅक, सिंगापूर, दुबई, अबूधाबी या आंतरराष्ट्रीय ठिकाणी उड्डाणे सुरू आहेत. सध्या विमानतळावरून मध्यम आकाराची बोईंग प्रवासी विमाने, १८० ते २२० क्षमता असलेल्या विमानांची उड्डाणे होतात. मात्र, विमानतळाच्या विस्ताराचा प्रस्ताव अद्याप नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.

याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, ‘पुणे विमानतळावरील धावपट्टीचे पूर्वेच्या ५५० ते ६०० मीटर आणि पश्मिचमेकडे सुमारे ३५० मीटर लांबी असा विस्तार करावा लागणार आहे. ‘पार्किंग बे, इंधन साठा क्षमता, टर्मिनल, विमानांची देखभाल दुरुस्ती यासाठी एकत्रित सुमारे ३०० एकर जागेची आवश्यकता आहे. मर्यादित पार्किग सुविधा असल्याने ठरावीक विमानांना जागा उपलब्ध होते. हवाई दलाचे विमानतळ असल्याने स्लाॅटनुसार आणि मर्यादेनुसार उड्डाणसेवा सुरू आहे. या विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविला आहे.’

पुण्यातील लोहगाव विमानतळ हे हवाई दलाचे आहे.  सैन्याच्या प्रशिक्षण आणि सरावासाठी विमानतळाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने  नागरी उड्डाणांसाठी मर्यादा येतात. त्यातच धावपट्टी विस्ताराचा प्रश्नही प्रलंबित आहे. पार्किंग बे, इंधन, माल वाहतूक यासाठी मोठ्या युरोप, अमेरिकेतील बोईंग ७७७, एअरबस यांसारख्या विमानांची वाहतूक महत्वाची असून ही विमाने या विमानतळावरून झेप घेऊ लागली तरच आणखी विकास वाढेल, प्रवाशांना सुलभ आणि सहज प्रवास करता येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून पुणेकर या विस्तारीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

विमानतळ विस्ताराचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. हवाई उड्डाणांमध्ये आणि प्रवासी सेवेत गतिमानता आणण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून विस्ताराबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

पुण्यातील हिंजवडी, खराडी, मगरपट्टा या ठिकाणांवर आयटी कंपन्या आहेत. चाकण, रांजणगाव, तळेगाव, कुरकुंभ, पिंपरी-चिंचवड, भोसरी आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. विमानतळ विस्तारामुळे या कंपन्यांच्या व्यवसाय वाढीला चालना मिळेल. रोजगार आणि विकासाच्या दृष्टीने विमानतळाचा विस्तार आवश्यक आहे. – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

विमानतळाचा आढावा

एकूण विमानतळाची क्षमता

विमानांची दैनंदिन उड्डाणे – २०० – २१०

पार्किंग बे – १०, १० एरोब्रीज

प्रवासी क्षमता – सुमारे ६५ हजार

सध्याची धावपट्टी – २,५४० मीटर

अपेक्षित धावपट्टी – ३,५३५ मीटरपेक्षा जास्त अपेक्षित भूसंपादन – १३ एकर