पुणे : बाणेर येथील प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी गुरुवारी सकाळी ईमेलद्वारे देण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाद्वारे (बीडीडीएस) संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. मात्र, तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू मिळून आली नाही.

गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पारपत्र कार्यालयाला एक ईमेल प्राप्त झाला. त्यामध्ये दोन व्यक्तींची नावे नमूद करून, त्यांना दुपारी एक वाजण्यापूर्वी कामावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. तसे न केल्यास कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, ई-मेलमध्ये उल्लेख असलेल्या नावाचे कर्मचारी त्या कार्यालयात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण इमारत रिकामी करून तपासणी केली.

अखेर कोणतीही धोकादायक वस्तू न आढळल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या पोलीस या अफवा पसरवणाऱ्या ईमेलचा तांत्रिक तपास करत आहेत. त्यानुसार संबंधितावर गुन्हा दखल केला जाणार असल्याची माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.