पुणे : पुणे शहरात खळबळ उडवून दिलेल्या कर्वेनगरमधील दोन भगिनींच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
कर्वेनगरमधील एका बंगल्यात भरदिवसा चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्यांनी सख्ख्या बहिणींवर तीक्ष्ण शस्त्रांचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना १७ एप्रिल २०१० रोजी घडली होती. चोरट्यांच्या हल्ल्यात स्मिता प्रभाकर पत्की (वय ५२) आणि सुलभा व्यंकटेश पाच्छापूरकर (वय ६३, दोघी रा. शाकंभरी बंगला, रघुकुल सोसायटी, कर्वेनगर) यांचा मृत्यू झाला होता. ही उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी पोलिसांनी अंबादास जाधव (वय ३२) पांडुरंग उर्फ पांड्या उर्फ अतुल बाळू जाधव (वय १९) बंटी वडवेराव (वय २२) आणि मल्लिकांत उर्फ लाल्या हनुमंत जाधव (वय २२, सर्व रा. सोलापूर) यांना अटक केली होती. आरोपींनी सोन्याच्या दोन पाटल्या, दोन मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, घड्याळ, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरून नेला होता.
आरोपींकडून २४ हजार रुपयांचा ऐवज आरोपींकडून जप्त करण्यात आला होता. दुहेरी हत्या प्रकरणात शिवाजीगनर सत्र न्यायालयाने आरोपीना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी गेले १५ वर्षे कारागृहात होते. त्यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली.
आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले, आरोपींच्या वतीने ॲड. ऋषीकेश शिंदे, ॲड. रवीराज सरवदे यांनी बाजू मांडली. ‘याप्रकरणात ओळख परेड पाच ते सहा महिन्यांनी झाली. गु्न्ह्यात चोरलेल्या दागिन्यांची ओळख ओळख परेडमध्ये पटविण्यात आले नव्हते. या गु्न्ह्यात बंगल्यात बागकाम करणारा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. गु्न्हा करण्यापूर्वी आदल्या दिवशी आरोपींनी बंगल्याची पाहणी केली होती, असे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितले होते.
प्रत्यक्षदर्शीच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली होतीत. त्यांची दृष्टी क्षीण झाली आहे. पाच ते सहा महिन्यांनी ओळख परेडमध्ये प्रत्यक्षदर्शी साश्रीदाराने आरोपींना ओळखले. दृष्टी क्षीण झाल्यानंतर आरोपींनी ते कसे ओळखू शकले ?’, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील शिंदे आमि सरवदे यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरुन चाैघा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
